Former England batter Graham Thorpe Passess away : इंग्लंड क्रिकेटसह संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी एक धक्कादायक बातमी आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थोर्पचं निधन झालं आहे. तो 55 वर्षांचा होता. थॉर्पे गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजारी होता. त्याच्या आजारपणाचं नेमक्या कारणाची माहिती देण्यात आलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
थोर्पची कारकिर्द
इंग्लंडकडून 100 टेस्ट खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये थोर्पेचा समावेश होता. 1993 ते 2005 या कालावधीमध्ये त्यानं 100 टेस्टमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यानं 16 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरीसह 6744 रन काढले. थोर्प 82 वन-डे खेळला. त्यामध्ये त्यानं 21 हाफ सेंच्युरीसह 2380 रन केले.
इंग्लिश कौंटीमधील दिग्गज खेळाडूंमध्ये ग्रॅहम थोर्पचा समावेश होतो. त्यानं 341 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 49 सेंच्युरींच्या मदतीनं 21937 रन काढले होते. तसंच A श्रेणीच्या क्रिकेटमध्ये 9 सेंच्युरीसह 10871 रन काढले.
कोच म्हणूनही यशस्वी
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसह त्या काळातील सर्व प्रमुख क्रिकेटपटूंसोबत थोर्प खेळला आहे. तो निवृत्तीनंतर कोच म्हणूनही दीर्घकाळ कार्यरत होता. थोर्प 2005 साली ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स टीमचा सर्वप्रथम कोच बनला. त्यानंतर इंग्लंड लायन्स टीमचाही कोच होता. इंग्लंडच्या तरुण खेळाडूंना शोधण्याची त्याच्यावर जबाबदारी होती.
( नक्की वाचा : पॅरिसमध्ये भारत इतिहास रचणार, आणखी 7 मेडल मिळणार! पाहा कोण आहेत दावेदार? )
2013 साली तो इंग्लंडच्या वन-डे आणि T20 टीमचा बॅटींग कोच होता. त्याचबरोबर 2020 साली पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये इंग्लंडचा हंगामी कोच म्हणूनही त्यानं काम केलं आहे. थोर्पची 2022 साली अफगाणिस्तानचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी तो गंभीर आजारी पडला. याच आजारपणात त्याचं निधन झालं.