भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर धर्म मानला जातो. 1983 साली कपिल देवच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं वन-डे वर्ल्ड कप जिंकला आणि क्रिकेट हे भारतीयांचे पॅशन बनला. गेल्या चार दशकात भारतीय क्रिकेटपटूंनी लोकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगमनानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही ग्लॅमर, पैसा आणि आर्थिक स्थैर्य मिळालंय. पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेटची लोकप्रियता आजही कमी आहे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती वेगानं बदलतीय. काही महिला क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. यामध्ये हरमनप्रीत कौर हे प्रमुख नाव आहे. एकेकाळी नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या हरमनप्रीतचा भारतीय टीमची कॅप्टन होण्यापर्यंतचा प्रवास सहज झालेला नाही.
सेहवागसोबत खेळणार का?
पंजाबमधल्या मोगामध्ये 1989 सालातील आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी हरमनचा जन्म झाला. तिचे वडील हरमंदर सिंह भुल्लर हे व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू होते. आपल्या मुलीनं हॉकीपटू व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण, हरमनला क्रिकेटर व्हायचं होतं. हॉकी स्टिक घेऊन क्रिकेट खेळणाऱ्या मुलीला पाहून हरमंदर यांनी तिला क्रिकेटर होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं ठरवलं.
हरमनच्या गावात त्यावेळी कोणतीही अकादमी नव्हती. ती लहान भाऊ गुरजिंदर भुल्लर आणि त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असते. त्यावेळी महिला क्रिकेट फारसे लोकप्रिय नव्हते. त्यामुळे 'तू काय वीरेंद्र सेहवागसोबत ओपन करणार का? असं हरमनच्या भावाचे मित्रं तिला चिडवत असत.
ज्ञान ज्योती स्कूल अदामीचे कोच कमलदीश सिंह सोढी यांनी हरमनचा खेळ पाहिला. सोढी तिच्या खेळानं प्रभावित झाले. पण, घरापासून 30 किलोमीटर दूर मुलीला पाठवणं आणि तिचा पूर्ण खर्च करणं हे जिल्हा कोर्टात क्लार्कची नोकरी करणाऱ्या हरमंदर सिंहसाठी सोपं नव्हतं. सोढी सरांनी त्यावरही मार्ग काढला. त्यांनी हरमनच्या राहण्याची तसंच कोचिंगची मोफत व्यवस्था केली. त्यामुळेच आजही हरमनप्रीत सोढी सरांना स्वत:चा गॉडफादर मानते.
या सर्व अडचणीनंतरही हरमनप्रीत कौरनं (HarmanPreet Kaur) जिद्द सोडली नाही. 7 मार्च 2009 रोजी तिनं टीम इंडियात पदार्पण केलं. आक्रमक बॅटिंगसह ऑफ स्पिन बॉलिंग करणारी हरमनप्रीत लवकरच टी20 टीमची सदस्य बनली. पण, 2013 पर्यंत ती फारसा प्रभाव टाकू शकली नाही. इंग्लंडविरुद्ध 2013 साली तिनं नाबाद 107 रन्सची खेळी केली. या खेळीची इंग्लंडची कॅप्टन चार्लोट एडवर्ड्सनंही तिची प्रशंसा केली होती.
नोकरीसाठी संघर्ष
भारतीय क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी धडपडत असलेल्या हरमनला नोकरीसाठीही मोठा संघर्ष करावा लागला. माजी क्रिकेटपटू डायना एडुलजी यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. हरमनला उत्तर रेल्वेकडून नोकरीचा प्रस्ताव मिळाला होता. पण, दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी तो मान्य केला नव्हता. त्यानंतर डायना यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कानावर ही गोष्ट घातली. सचिननं एक क्रिकेटपटू आणि तत्कालीन राज्यसभा खासदार या नात्यानं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र पाठवलं आणि हरमनला रेल्वेत नोकरी मिळाली.
हरमनची ऐतिहासिक खेळी
या सर्व अडचणीनंतरही हरमननं हार मानली नाही. तिनं बॅटनं सर्व विरोधकांना चोख उत्तर दिलं. 20 जुलै 2017 हा दिवस भारतीय महिला क्रिकेटचा कोणताही फॅन कधी विसरणार नाही. त्यावेळी सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमननं 171 रन्सची ऐतिहासिक खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतानं सेमी फायनल जिंकली. हरमनची तुलना थेट तिचा आदर्श असलेल्या वीरेंद्र सेहवागशी होऊ लागली.
त्यानंतर वर्षभरातच 2018 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये भारताकडून शतक झळकावणा्री पहिली भारतीय होण्याचा मान हरमननं मिळवला. या खेळीनंतर हरमनप्रीत लवकरच भारतीय टीमची कॅप्टन बनली. महिला आयपीएलमधील (WPL) मुंबई इंडियन्स टीमचीही ती कॅप्टन आहे. तिच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं WPL च्या पहिल्या सिझनचं विजेतेपद मिळवलं होतं.