टाटा उद्योगसमुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं नुकतच निधन झालं. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी टाटा यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईत आज रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून राज्यात आज महायुती सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये टाटा उद्योगसमुहाने मोलाचा वाटा उचलला आहे. रतन टाटा यांनी आपल्या कौशल्याद्वारे भारतीय उद्योगजगताचा झेंडा पार परदेशापर्यंत पोहचवला. सामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यापासून ते भारताला उद्योगक्षेत्रात परिपूर्ण करण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. परंतु टाटा उद्योगसमुहाने फक्त उद्योग आणि व्यवसाय यापूरतं स्वतःला मर्यादीत न ठेवता भारताच्या क्रीडा क्षेत्रालाही जागतिक पातळीवर नेण्याचं काम केलं आहे. क्रिकेटशी टाटा उद्योगसमुहाचं पहिल्यापासूनचं नातं राहिलं आहे. परंतू याव्यतिरीक्तही टाटा समुहाने अन्य क्रीडा प्रकारांनाही मोलाचा हातभार लावला आहे.
स्थापनेपासून तीन दशकांपेक्षा अधिक काळ टाटा उद्योगसमुहाने भारताच्या क्रीडा जगताला विविध रुपाने आपला हातभार लावला आहे. ज्यात खेळाडूंसाठी अद्ययावत ट्रेनिंग सेंटर उभारण्यापासून ते गरजू खेळाडूंना स्पॉन्सरशीप प्रदान करण्यापर्यंत महत्वाचा वाटा टाटा उद्योगसमुहाने उचलला आहे.
संस्थापक जमशेदशी टाटा यांच्यापासून सुरु आहे परंपरा -
टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे स्वतः क्रीडाप्रेमी होते. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ होता. त्यांचा मुलगा सर दोराब टाटा हा केंब्रिज विद्यापीठाकडून क्रिकेट खेळला असून मुंबईतील विलींग्डन क्रिकेट क्लब स्थापन करण्यात सर दोराब टाटा यांचा महत्वाचा वाटा आहे. १९२० साली Antwerp Olympics मध्ये गेलेल्या भारतीय खेळाडूंचा सर्व खर्च हा सर दोराब टाटा यांनी उचलला होता. त्यावेळेस ते Indian Olympic Council चे अध्यक्ष होते. यानंतर १९२४ साली झालेल्या Paris Olympics मध्येही दोराब टाटा यांनी भारतीय समूहाचा खर्च उचलला होता.
भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातही टाटाच होते सोबतीला -
भारतात कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा नसला तरीही ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळवलेला हॉकी हा खेळ भारतात अघोषित राष्ट्रीय खेळ मानला जातो. भारतीय हॉकीच्या सूवर्णकाळात नवल टाटा हे भारतीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्यात कार्यकाळात भारताने ऑलिम्पिकमध्ये सलग तीन स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. याव्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचंही अध्यक्षपद नवल टाटा यांनी भूषवलं होतं.
टाटा उद्योगसमुहातील आणि समुहाबाहेरील खेळाडूंना व्यासपीठ मिळावं यासाठी १९३७ साली Tata Sports Club ची स्थापना करण्यात आली. या क्लबद्वारे देशभरातील ग्रामीण पातळीवरील अनेक खेळाडूंना त्यांच्यातलं कौशल्य ओळखून पुढील वाटचालीसाठी मदत करण्यात यायची. इतकच नव्हे तर आपल्या क्लबच्या माध्यमातून टाटा उद्योगसमुहाने विविध खेळांमध्ये अनेक दिग्गज प्रशिक्षकही भारताला दिले आहेत.
खेळाडूंना आर्थिक सहाय्य करण्याचं मोलाचं काम टाटा समुहाने केलं -
फारपूर्वीपासून भारतात क्रीडा क्षेत्रात आपल्या मुलांना पाठवण्यात भारतीय पालकांमध्ये फारशी रुची नसायची. खेळ खेळून पोट भरणार आहेस का? असा प्रश्न प्रत्येक भारतीय घरात पालक आपल्या मुलांना विचारायचे. त्यामुळे उमेदीच्या काळात खेळाडूंना आर्थिक सहाय्य देऊन त्यांची ही विवंचना संपवण्याचं काम टाटा समुहाने केलं होतं. जुन्या काळात याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारताचे माजी विकेटकिपर फारुख इंजिनीअर यांना टाटा समुहाचं अर्थसहाय्य लाभलं होतं. याव्यतिरीक्त जुन्या काळात नरी कॉन्ट्रॅक्टर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, संदीप पाटील ते थेट सौरव गांगुली यासारख्या क्रिकेटपटूंनाही त्यांच्या उमेदीच्या काळात टाटा समुहाचं अर्थसहाय्य लाभलं आहे.
फक्त क्रिकेटच नाही इतर खेळ आणि खेळाडूंनाही टाटा समुहाचा मोलाचा हातभार -
भारतात क्रिकेट खेळाला प्रसिद्धी असली तरीही टाटा समुहाने आपल्या माध्यमातून इतर खेळांनाही तितकीच मोलाची मदत केली आहे. फुटबॉल, हॉकी, तिरंदाजी, कबड्डी यामधील अनेक खेळाडूंना टाटा समुहाची मदत मिळाली आहे. आर्थिक मदतीसोबतच टाटा समुहाने आपल्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून या सर्व क्रीडा प्रकारातील खेळाडूंना चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण मिळावं याची काळजी घेतली आहे. टाटा समुहाशी संलग्न असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना आतापर्यंत १ पद्मभूषण, ११ पद्मश्री, १ खेलरत्न, १ ध्यानचंद, ६ द्रोणाचार्य आणि ४२ अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत.
सध्या प्रचलित असलेल्या खेळाडूंसोबतच येणाऱ्या पिढीलाही खेळांची आवड व्हावी यासाठी ग्रामीण पातळीवर टाटा उद्योगसमुहातर्फे क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. ज्यात दरवर्षी हजारो खेळाडू सहभागी होतात. फुटबॉल, तिरंदाजी, व्हॉलीबॉल, अॅथलेटीक्स सारख्या क्रीडा स्पर्धा टाटा समुह स्थानिक पातळीवर आयोजित करत असतो. झारखंड, ओडीशा यासारख्या राज्यांत टाटा समुहाने आतापर्यंत क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देत कधीही संधी न मिळालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली आहे.
जमशेदपूर सारखं शहर वसवण्यात टाटा समुहाचा मोलाचा वाटा मानला जातो. उद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर तयार होत असताना जमशेदजी टाटा यांनी आपला मुलगा सर दोराबजी टाटा यांना फुटबॉल, हॉकी आणि इतर खेळांसाठी मैदानं तयार करायला जागा ठेवून द्या अशी सूचना केली होती. हीच सूचना टाटा उद्योगसमुहाने आतापर्यंत अमलात आणून क्रीडा जगतात आपला ठसा उमटवला आहे.
टाटा समुहात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी कॉमनवेल्थ, एशियन गेम्स सारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत पदकांची कमाई केली आहे.
महत्वाच्या मैदानांमध्येही टाटा उद्योगसमुहाचा ठसा -
फक्त खेळाडूंना आर्थिक सहाय्य करण्यापर्यंतच टाटा उद्योगसमुह थांबला नाही. देशात अनेक महत्वाची मैदानं तयार करण्यातही टाटा समुहाने आपलं योगदान दिलं आहे. मुंबईतल्या ब्रेबॉन क्रिकेट स्टेडीअमच्या उभारणीत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला टाटा उद्योगसमुहाने मदत केली आहे. १९३९ साली टाटा समुहाने जमशेदपूर येथे स्वतःचं क्रिकेट मैदान तयार केलं, या मैदानाचं नाव कीनन क्रिकेट स्टेडीअम. मुंबई क्रिकेटची शान असलेल्या वानखेडे स्टेडीअमच्या उभारणीतही टाटा समुहाचं मोलाचं योगदान आहे. यासाठी या मैदानावरील एका बाजूला Tata End असं नाव देण्यात आलं आहे.
जमशेदपूर येथे १९९१ साली तयार करण्यात आलेल्या JRD Tata Sports Complex मध्ये एक-दोन नव्हे तर १८ क्रीडा प्रकारांसाठीच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. Tata Steel Adventure Foundation, Tata Football Academy, Tata Archery Academy, The Centre of Excellence for Football, Naval Tata Hockey Academy, Odisha Naval Tata Hockey High Performance Centre, TSAF Climbing Academy सारख्या काही प्रमुख संस्था या टाटा समुहाने भारतीय क्रीडा क्षेत्रात नवीन टॅलेंट निर्माण व्हावं यासाठी आजही तितक्याच जोमाने काम करत आहेत.
याव्यतिरीक्त टेनिस, मॅरेथॉन सारख्या स्पर्धांमध्येही टाटाने आपली वेगळी छाप वेळोवेळी सोडली आहे. कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन यासारख्या क्रीडा प्रकारांमध्येही टाटा समुहाने खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन करुन मोलाची साथ दिली आहे. इतकच नव्हे तर देशभरात नव्हे तर जगभरात कोट्यवधींच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या आयपीएल स्पर्धेचं प्रायोजकत्वही टाटा समुहाने घेतलं आहे.