जाहिरात

T20 World Cup 2026 Schedule: भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! फायनलबाबत ICC चा धक्कादायक निर्णय

T20 World Cup 2026 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कप 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

T20 World Cup 2026 Schedule:  भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! फायनलबाबत ICC चा धक्कादायक निर्णय
T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट फॅन्सची मोठी प्रतीक्षा संपली आहे.
मुंबई:

T20 World Cup 2026 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कप 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यजमान आणि गतविजेत्या भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत होईल. पण क्रिकेट जगताला सर्वाधिक उत्सुकता असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हाय-व्होल्टेज सामना 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाईल. हा वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी रोजी सुरू होऊन 8 मार्च पर्यंत भारत आणि श्रीलंकेतील आठ ठिकाणी रंगणार आहे.

पुन्हा एकदा 'महामुकाबला'

या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच गटात (Group A) ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत या गटात युएसए, नामिबिया आणि नेदरलँड्स हे संघ देखील आहेत. या दोन संघात 2025 च्या आशिया कपमध्ये तीन वेळा सामना झाला होता, ज्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सर्वच्या सर्व मॅच जिंकून फायनलमध्ये 5-विकेटने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे वर्ल्ड कपमधील ही लढत आणखी रोमांचक होणार आहे.

( नक्की वाचा : IND vs SA : ऐतिहासिक ! बुमराहने मार्करमचा स्टंप उखडताच 'तो' ब्रेक आला; 148 वर्षांत न पाहिलेला क्षण )
 

टीम इंडियाचे सामने कुठे होणार?

गतविजेत्या टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील गट स्टेजमधील सामने 7 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान खेळवले जाणार आहेत. भारताच्या वेळापत्रकानुसार, स्पर्धेचा उद्‌घाटन सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे युएसए संघाविरुद्ध होणार आहे. यानंतरचा दुसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे नामिबिया विरुद्ध होईल. क्रिकेट जगताला उत्सुकता असलेला सर्वात मोठा सामना, पाकिस्तान विरुद्धची लढत, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो (श्रीलंका) येथे होणार आहे. आणि ग्रुप स्टेजमधील भारताचा शेवटचा सामना 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे नेदरलँड्स विरुद्ध खेळवला जाईल.

...... तर फायनलचं ठिकाण बदलणार!

टी-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना सुरुवातीला भारतातील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, एक मोठी अट ठेवण्यात आली आहे: जर पाकिस्तान संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर राजकीय तणावामुळे 'तटस्थ ठिकाण' (Neutral Venue) कराराअंतर्गत अंतिम सामना श्रीलंकेमध्ये हलवला जाईल. पाकिस्तानने 2007 आणि 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली होती आणि युनिस खानच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले होते.


या वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. यात भारत आणि श्रीलंकेसह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांसारख्या मोठ्या टीमसह कॅनडा, इटली, नेपाळ, ओमान आणि युएई सारख्या टीमही विजेतेपदासाठी संघर्ष करताना दिसतील. या स्पर्धेतील सामने भारतात पाच आणि श्रीलंकेत तीन ठिकाणी होणार आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com