ICC Rule Changes: वाईड बॉलसह क्रिकेट सामन्यांचे अनेक नियम बदलणार, ICC चा ऐतिहासिक निर्णय

ICC Rule Changes: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी अहमदाबादमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत हे मोठे निर्णय घेण्यात आले.

जाहिरात
Read Time: 3 mins

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने क्रिकेट खेळ अधिक रंजक बनवण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. अहमदाबाद येथे पार पडलेल्या आयसीसीच्या बोर्ड बैठकीत अनेक क्रांतिकारी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 (T20I) क्रिकेटच्या नियमांचा समावेश आहे. खराब प्रकाशामुळे वाया जाणारा वेळ वाचवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा या बदलांमागील मुख्य उद्देश आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, जून महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मालिकेला हे नियम लागू नसतील, परंतु त्यानंतरच्या सर्व मालिकांमध्ये हे बदल पाहायला मिळू शकतात.

चालू टेस्ट मॅचमध्ये बदलता येणार बॉल 

कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा खराब प्रकाशामुळे सामना थांबवावा लागतो आणि दिवसाचा खेळ वाया जातो. यावर आयसीसीने एक अनोखा उपाय शोधला आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात जर खराब प्रकाशामुळे खेळ थांबण्याची वेळ आली, तर मैदानावर रेड बॉल ऐवजी पिंक बॉल वापरून सामना सुरू ठेवता येईल. हा नियम लागू करण्यासाठी कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांची आणि सामना सुरू असताना दोन्ही संघांच्या कर्णधारांची संमती असणे आवश्यक राहील. हा नियम केवळ अशाच मैदानांवर लागू होईल जिथे फ्लड लाईट्स उपलब्ध आहेत. दरम्यान, डे-नाईट कसोटी सामने आधीप्रमाणेच संपूर्ण पिंक बॉलने खेळवले जातील.

Advertisement

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)

ड्रिंक्स ब्रेकमध्ये आता मुख्य प्रशिक्षक मैदानावर उतरणार

आतापर्यंत फक्त आयपीएलसारख्या टी-20 लीगमध्येच स्ट्रॅटेजिक टाईमआऊट दरम्यान प्रशिक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हे पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वनडे आणि टी-20 सामन्यांमध्ये ठरवून दिलेल्या ड्रिंक्स इंटरव्हलदरम्यान आता हेड कोच  किंवा निवडक सपोर्ट स्टाफ मैदानात जाऊन खेळाडूंना थेट रणनीती सांगू शकतील. आतापर्यंत केवळ पाणी घेऊन जाणारे राखीव खेळाडूच ड्रेसिंग रूमचा संदेश खेळणाऱ्या खेळाडूंपर्यंत पोहोचवत असत.

टी-20 मध्ये 15 मिनिटांचा ब्रेक

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन डावांच्या दरम्यान आता 15 मिनिटांचा ब्रेक असेल आणि खेळ पुन्हा सुरू झाल्यावर फलंदाजांना तात्काळ तयार राहावे लागेल, जेणेकरून सामना लवकर संपण्यास मदत होईल.

वाईड बॉलचा नवा नियम 

2025 मध्ये सुरू झालेल्या 'लेग-साइड वाईड ट्रायल'ला आता पूर्णपणे मान्यता देण्यात आली आहे. जर फलंदाज खेळताना जागेवरून हलला, तर वाईड बॉल ठरवण्यासाठी फलंदाजाची ती पोझिशन रेफरन्स पॉईंट मानली जाईल, जेव्हा चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटला होता. गोलंदाजांच्या संशयास्पद बॉलिंग अॅक्शनचा तपास करताना मॅच ऑफिशियल्सना आता हॉक-आय डेटाचा वापर करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Riyan Angry on V. Sooryavanshi: 96 धावा करणाऱ्या वैभवला रियानने झापलं? RR चा कर्णधार ट्रोलर्सच्या निशाण्यावर)

महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात बदल

पुढील वर्षी जून-जुलैमध्ये प्रस्तावित असलेली महिलांची चॅम्पियन्स ट्रॉफी (Women's Champions Trophy) आता पुढे ढकलण्यात आली असून ती 14 ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान खेळवली जाईल. याशिवाय, 10 संघांची 'विमेन्स इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी 2026' मध्ये लॉन्च केली जाईल, ज्यामध्ये 5 पूर्ण सदस्य आणि 5 असोसिएट देश असतील.

Advertisement

'क्रिकेट कॅनडा'वर निलंबनाची कारवाई

आयसीसीने एका मोठ्या प्रशासकीय कारवाईत क्रिकेट कॅनडाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. आयसीसीच्या मते, क्रिकेट कॅनडाने सदस्यत्वाच्या अटींचे गंभीर उल्लंघन केले आहे. गेल्या 18 महिन्यांपासून कॅनडाच्या क्रिकेट बोर्डात प्रशासकीय वाद सुरू आहेत आणि काही प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराची चौकशीही सुरू आहे. याच कारणामुळे आयसीसीने त्यांची मिळणारी सर्व फंडिंग रोखली असून त्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
 

Topics mentioned in this article