IND vs IRE: संपूर्ण क्रीडा विश्व फुटबॉल विश्वचषकाचा आनंद घेण्यात मग्न असताना भारतीय क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसलाय. सलग दोन T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा आयर्लंड विरुद्ध धक्कादायक पराभव झाला. भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील T20 सीरिजला शुक्रवारी सुरुवात झाली. या मॅचमध्ये आयर्लंडनं बलाढ्य टीम इंडियाचा 34 रन्सनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांच्या इतिहासात आयर्लंडचा टीम इंडियाविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे.
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या या पराभवाची पाच प्रमुख कारणं काय आहेत ते पाहूया
पहिलं कारण
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 182/9 एवढा स्कोअर केला. आयर्लंडचा कॅप्टन लॉर्कन टकरने 36 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली, तर गारेथ डेलनीने 32 बॉलमध्ये 49 रन केले. वास्तविक या सामन्यात आयर्लंडची सुरुवात खराब झाली होती. त्यांच्या 4 विकेट्स 51 रन्सवरच गेल्या होत्या. पण, त्यानंतर आयर्लंडच्या बॅटर्सनं कमबॅक करत टीमला 182 रन्सचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात आलेलं अपयश हे टीम इंडियाच्या पराभवाचं पहिलं कारण ठरलं.
दुसरं कारण
टीम इंडियाच्या पराभवाचं दुसरं कारण ठरलं ते म्हणजे प्रसिद्ध कृष्णाची खराब बॉलिंग. कृष्णा आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेकदा महागडा ठरला आहे. या सामन्यातही त्यानं ती परंपरा जपली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 14.25 च्या इकोनॉमी रेटनं 57 रन्स दिले. आयर्लंडच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये कृष्णानं तब्बल 27 रन्स दिले. एका ओव्हरमध्ये 27 रन हा कोणत्याही भारतीय बॉलरने आयर्लंडविरुद्ध दिलेले सर्वाधिक रन्स आहेत.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीनं टीम इंडियाच्या जर्सीसाठी 3 नंबर का निवडला? खास कारण झालं उघड )
तिसरं कारण
टीम इंडियाच्या पराभवाचं तिसरं कारण ठरलं ते म्हणजे टॉप ऑर्डरची निराशा. संजू सॅमसन आणि इशान किशन ही T20 वर्ल्ड कप विजेतेपदाची शिल्पकार जोडी आयर्लंड विरुद्ध सपशेल अपयशी ठरली. संजूनं 5 तर इशान किशननं फक्त 1 रन काढला. वास्तविक अभिषेक शर्मानं 20 बॉलमध्ये 49 रन्स करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण, त्याचा संजू आणि इशान किशन झटपट आऊट झाल्यानं त्याचा पूर्ण फायदा भारतीय टीमला घेता आला नाही.
चौथं कारण
टीम इंडियाचा नवोदित कॅप्टन श्रेयस अय्यरकडून आजच्या सामन्यात मोठी अपेक्षा होती. श्रेयसनं आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून चौथ्या क्रमांकावर खेळताना दमदार कामगिरी केली आहे. पण, भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून पहिल्या सामन्यात तो बॅटनं अपयशी ठरला. श्रेयस 7 बॉलमध्ये फक्त 3 रन काढून आऊट झाला. कॅप्टन श्रेयसची मोक्याच्या क्षणी फ्लॉप कामगिरी हे भारतीय टीमच्या पराभवाचं चौथं कारण ठरली.
पाचवं कारण
टीम इंडियाच्या पराभवाचं पाचवं आणि शेवटचं कारण ठरला व्हाईस कॅप्टन तिलक वर्मा. तिलक वर्मावर गेल्या काही सामन्यांपासून संथ खेळीबद्दल टीका होत आहे. आयर्लंड विरुद्धही तो ही टीका सार्थ करणारी खेळी केला. तिलकनं 21 बॉलमध्ये 19 रन केले.चांगला जम बसून आणि भरपूर बॉल खेळूनही तिलकला मॅच जिंकून देता आली नाही. उलट त्याच्या संथ खेळीनं भारतीय टीमवरील प्रेशर वाढलं आणि टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला.