India Vs Pakistan Champion's Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाचवा आणि हायहोल्टेज सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादन केला आहे. विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दिलेले 242 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पूर्ण केले. या लाजिरवाण्या पराभवासोबतच पाकिस्तानने या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानने दिलेल्या 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिलने जोरदार फटकेबाजी केली. खणखणीत चौकार, षटकारांची आतषबाजी सुरु असतानाच रोहित शर्मा आऊट झाला. त्यापाठोपाठ शुभमन गिलचाही त्रिफळा उडाला. त्यानंतर मैदानात उतरेल्या विराट कोहलीने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली, त्याला दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यरने खंबीर साथ दिली, मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो 56 वर आऊट झाला.
विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने शेवटपर्यंत फटकेबाजी करत जबरदस्त शतक झळकावले. तोच या सामन्याचा हिरो ठरला. विजयासाठी दोन धावांची गरज असताना कोहलीने खणखणीत चौकार ठोकत संघाचा विजय आणि त्याचे शतकही पूर्ण केले. टीम इंडियाने 42.3 ओव्हरमध्ये 244 धावा केल्या.
IND Vs PAK: अक्षर पटेलचा खतरनाक 'रॉकेट थ्रो', इमामचा खेळ खल्लास; पाहा जबरदस्त VIDEO
तत्पुर्वी, पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हकने सामन्याला सावध सुरुवात केली. मात्र नवव्या षटकात सलग दोन धक्के देत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ही जोडी फोडली. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती सुरु झाली.
पाकिस्तानकडून साऊद शकीलने 76 चेंडूत 62 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. खुसदिल शाहने 38 धावा केल्या. बाबर आझमला फक्त 23 धावा करता आल्या. दुसरीकडे, टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन, हार्दिक पांड्याने दोन आणि हर्षित राणा तसेच रविंद्र जडेजाने एक बळी घेतला.