Mohammed Siraj on IND vs PAK match in ICC: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये सुरु होत आहे. या टेस्टपूर्वी सुरु असलेल्या पत्रका परिषदेतील मोहम्मद सिराजचं एक उत्तर चांगलंच व्हायरल झालं आहे. टीम इंडियाच्या फास्ट बॉलरला या पत्रकार परिषदेमध्ये अचानक भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
एका रिपोर्टरने त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (WCL) मधील भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना रद्द झाल्याबद्दल सिराजला विचारले, त्यावर सिराजनं त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. WCL मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे, असे जेव्हा एका रिपोर्टरने सिराजला विचारले, तेव्हा सिराजने प्रतिक्रिया देत उत्तर दिले, "मला माहित नाही." यानंतर रिपोर्टरने सिराजला "भारत आयसीसी टूर्नामेंट्समध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळेल का?"असा आणखी एक अडचणीचा प्रश्न विचारला. त्यावर "मला याबद्दल काय ते माहित नाही," असे उत्तर सिराजने दिले. सिराजचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
( नक्की वाचा : WCL 2025 मध्ये शाहिद आफ्रिदी आणि अजय देवगन यांची भेट झाली? समजून घ्या Viral फोटो मागील सत्य )
चौथ्या टेस्टमध्ये बुमराह खेळणार
टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळणार असल्याचं सिराजनं यावेळी स्पष्ट केलं. बुमराहचा वर्कलोड लक्षात घेता तो या सीरिजमधील पाचपैकी तीन टेस्ट खेळेल असे टीम मॅनेजमेंटनं स्पष्ट केले होते. पण, चौथ्या टेस्टपूर्वी आकाशदीप आणि अर्शदीप सिंग जखमी झाल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. जखमी खेळाडूंमुळे अंकुश कंबोजला कव्हर म्हणून बोलवण्यात आले आहे.
त्या परिस्थितीमध्ये जसप्रीत बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळणे ही टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमध्ये भारतीय टीम 1-2 नं पिछाडीवर आहे. आता ही सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीमला उर्वरित दोन्ही टेस्ट जिंकणे आवश्यक आहे.