रवी पत्की
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका संपली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी हरल्याने भारतीय संघाला सर्व बाजूंनी तिखट टीकेला सामोरे जावे लागत आहे आणि त्यात अयोग्य काहीही नाही. T20 वर्ल्ड कप जिंकल्यावर खेळाडूंना डोक्यावरच नाही तर ओपन टॉप बसवर घेणारे भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने शस्त्र टाकल्यावर शस्त्र उगारून भारतीय संघावर चालून गेले आहेत.
ह्या कसोटी मालिकेने एक महत्वाचा दिलासा दिला तो म्हणजे भारतीय प्रेक्षक कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही तितकाच रस घेतात, हे सिद्ध झालं. 2020 -21 साली झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पेक्षा ह्या वेळेस 160%नी T.V वर प्रेक्षक संख्या वाढली. 9ते 10 कोटी लोक 'स्टार स्पोर्ट्स'वर प्रत्येक कसोटी बघत होते. हे लक्षात घेता फक्त T20 च्या आहारी जाऊ नये हे BCCI ला कळले असेल तर बरे होईल. ज्या प्रमाणात क्रिकेट रसिक प्रतिक्रिया देत आहेत ते बघता अस्सल क्रिकेट फॅन अजून शाबूत आहे हे पाहून फार बरे वाटले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जखमेत सुरी गोल फिरली
भारतीय संघाने अपेक्षित कामगिरी केली नाही. पण ऑस्ट्रेलियातील हा पराभव न्यूझीलंडने भारतात येऊन भारताला 3-0 व्हाइट वॉश दिला होता. खरा वार न्यूझीलंडने केला होता. फॅन्सची जखम भळाभळा वहात होती. ऑस्ट्रेलियात सिरीज ड्रॉ झाली असती तरी जखमेवर खपली बसली असती. पण, पुन्हा पराभव आणि त्यात दिग्गज खळाडूंनी निराश केल्यावर जखमेतून सुरी गोल फिरवली गेली.
कोहली,रोहित,गिल,राहुल वगैरे सुपरस्टार मला आजकाल जुन्या इमारतींच्या बाहेर वर्षानुवर्षे पुनर्विकासाचे (redevelopment)चे बोर्ड लागलेले असतात ना तसे वाटतात. नुसतेच आशेला लावतात होत काहीच नाही.
( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेट तोपर्यंतच सुरक्षित... ड्रेसिंग रुमच्या प्रश्नावर गंभीरनं सुनावलं )
जगभरात समस्या
प्रामाणिकपणे सांगायचं तर जगातील सर्वच क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटमध्ये आता दोन्ही फॉर्मेटशी जुळवून घेणे अवघड झाले आहे. T20 च्या फॉरमॅटमधून टेस्ट फॉरमॅट मध्ये स्वतःला साच्यात बसवण्याचे तंत्र आणि temperament खेळाडूंना अवघड होतं चाललंय. त्यात चार दिवसांचे रणजी सामने खेळण्याचे मोटिव्हेशन गोळा करणे, कुटुंब,आरामदायी जीवन,व्यावसायिक दृष्टीकोन ह्यामुळे सगळ्यात अवघड झाले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या देशातील खेळपट्टींशी जुळवून घेण्याचं आव्हानही सोपं नाही. हा फक्त बॅटर्सचा प्रश्न नाही. तर बॉलर्सनाही देखील T20 मध्ये बॅटर्सना रोखण्यासाठी बॉलिंग करणे आणि टेस्टमध्ये विकेट घेण्याच्या लाईन आणि लेंग्थवर शिफ्ट होणे जिकरीचे आहे.
( नक्की वाचा : IND vs AUS: आणखी एक ड्रामा, 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन? कोण आहे 'Mr. Fix-It'? )
इंग्लंड अपवाद का?
या अडचणींचा सर्वच संघांना सामना करावा लागतोय. त्यानंतरही कोणते संघ टेस्टमध्ये त्यातल्या त्यात सातत्यानं चांगली कमगिरी करत आहेत आणि का? हा प्रश्न विचारला तर पहिला संघ डोळ्यासमोर येतो तो म्हणजे इंग्लंड. इंग्लंडने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानला त्यांच्या देशात जाऊन हरवलं आहे.
जागतिक क्रिकेटमधील ट्रेंडला इंग्लंड अपवाद का ठरला? कारण इंग्लंडच्या टीममध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वस्व पणाला लावणारे जो रुट, स्टुअर्ट ब्रॉड, अँडरसन सारखे खेेळाडू आहेत. तसंच त्यांचा कॅप्टन बेन स्टोक्सची गुणवत्ता ही दुर्मीळ गटातील आहे. तो विविध फॉरमॅट आणि विविध खेळपट्ट्यांशी सहज स्वत:ला जुळवून घेतो.
( नक्की वाचा : आता खूप झालं ! गौतम गंभीरची विराट-रोहितसह संपूर्ण टीमला तंबी, ड्रेसिंग रुममधील धक्कादायक रिपोर्ट )
ऑस्ट्रेलियात पराभव का झाला?
ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाच्या पराभवात यजमान टीमच्या तीन फास्ट बॉलर्सच्या लाजवाब बॉलिंगचा मोठा वाटा आहे. स्टार्क्स, कमिन्स, हेजलवूड, बोलंड या सर्वांनी विजयात योगदान दिलं. कमिन्स 2023 मधील वर्ल्ड फायनलला प्लॅन प्रमाणे तंतोतंत बॉलिंग करतो. तसाच तो टेस्टमध्येही टप्पा सोडत नाही. तो देखील जगभर T20 क्रिकेट खेळतो. तर मग कमिन्स वेगळं काय करतो? त्याचं उत्तर सोपं आहे. तो दोन्ही फॉरमॅटच्यापूर्वी वेळ देऊन वेगळा सराव करतो.
T20 म्हणजे एखाद्या रागावर आधारित 3-4 मिनिटांची चित्रपट गीत गाणे आणि टेस्ट म्हणजे तोच राग एक तास स्वरविस्तार करून गाणे. चित्रपट गीते गाणारे डायरेक्ट सवाईच्या मैफलीला बसतायत हा प्रॉब्लेम आहे. भारतात सध्या चाललेल्या क्रिकेट संस्कृतीवरून ही परिस्थिरी सुधारेल असे वाटत नाही. कसोटी मालिका हरल्यावर एक T20 स्पर्धा जिंकली की लोक कसोटीतील पराभव विसरतात. मग ह्यावर उपाय काय? खेळाडूंना दीर्घ प्रॅक्टिसच्या मॅचेस बंधनकारक करणे किंवा टेस्ट आणि T20 संघ वेगळा करणे. टेस्ट संघाला T20 इतके मानधन देणे.
सिडनीचे पिच ग्रीन टॉप होते. पिच क्रिकेट ग्राउंडवर आहे का ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या वेंडी वाईटली पार्कवर स्टंप ठोकले आहेत अशी शंका यावी असे पिचवर गवत. पण इतिहास असे सांगतो की ग्रीन टॉप असेल तर भारताला फायद्याचे ठरते. भारत प्रतिस्पर्ध्याच्या 20 विकेट्स घेऊ शकतो आणि मॅच जिंकतो. दक्षिण आफ्रिकेत,इंग्लंड मध्ये भारताने जिंकलेले कसोटी सामने ग्रीन टॉप वर श्रीसंत,जहीर खान, शमी,भुवनेश्वर, बुमराह, इशांत यांच्या जिगरबाज बॉलिंगने जिंकले आहेत. पण, ह्यावेळेस बुमराहला सिराजकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही आणि तिसरा बॉलर भेदक नव्हताच.
संपूर्ण मालिकेत आपण मोहम्मद शमीला प्रचंड मिस केले. शमी बुमराहचा साथीदार आहे आणि सिराज पहिला बदल (First Change) आहे. आपण यापूर्वी ऑस्ट्रेलियात दोनदा मालिका जिंकली. त्या विजयात दोन बॅटरचे चांगले योगदान, दोन बॅटरचे मध्यम योगदान आणि तीन बॉलर्सची सातत्यपूर्ण बॉलिंग यांचं योगदान आहे. या सीरिजमध्ये फक्त एकट्या जैस्वालची सरासरी 40 पेक्षा जास्त आहे. एका बंदुकीनं शत्रूच्या तोफखान्याशी किती लढणार? भारतीय टेस्ट टीममध्ये टेस्ट क्रिकेटला महत्व देणाऱ्या खेळाडूंना संधी देणे आवश्यक आहे. पण असे खेळाडू तरी आता किती राहिले आहेत? भारतीय टेस्ट क्रिकेटला पुन्हा मार्गस्थ करणे हे खूप मोठे आव्हान आहे.
( लेखक रवी पत्की हे क्रिकेट समीक्षक आहेत.)