टी-20 विश्वचषक 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. सलग तिसऱ्या विश्वचषकात हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येत आहेत. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट असून, पाऊस झाल्यास भारताचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या नियमांमुळे या सामन्यात पावसाचा फटका बसल्यास इंग्लंडचा फायदा होणार आहे.
रिझर्व्ह-डे (Reserve Day) आणि पावसाचे नियम
आयसीसीने या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी 6 मार्च हा दिवस 'रिझर्व्ह-डे' म्हणून ठेवला आहे.
नियम 1: जर 5 मार्चला पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर सामना 6 मार्चला खेळवला जाईल.
नियम 2: जर 5 मार्चला खेळ सुरू होऊन पावसामुळे थांबला, तर दुसऱ्या दिवशी खेळ तिथूनच पुढे सुरू होईल.
नियम 3 : जर रिझर्व्ह-डेलाही (6 मार्च) पाऊस थांबला नाही आणि सामना पूर्णपणे रद्द झाला, तर सुपर-8 फेरीत अव्वल कामगिरी करणाऱ्या संघाला फायनलमध्ये प्रवेश दिला जाईल.
इंग्लंडला का होणार फायदा?
सुपर-8 फेरीतील कामगिरी पाहिली तर इंग्लंडचा पारडा जड आहे. इंग्लंडने सुपर-8 मध्ये आपले तिन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने जिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे, सामना रद्द झाल्यास इंग्लंडचा संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल.
भारत विरुद्ध इंग्लंड
- एकूण सामने: 29
- भारताचे विजय: 17
- इंग्लंडचे विजय: 12