Shashank Singh पंजाबच्या नव्या हिरोचं आहे मुंबईशी कनेक्शन

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2024 : पंजाबच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शशांक सिंहचं मुंबईशी कनेक्शन आहे. (फोटो : BCCI/IPL)
मुंबई:

आयपीएल 2024 मधील रंगत वाढत चाललीय. पंजाब किंग्जनं गुरुवारी (4 एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा  3 विकेट्सनं पराभव केला. गुजरात आणि पंजाबमधील हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार ठरला. अखेर फक्त 1 बॉल शिल्लक असताना पंजाबनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. पंजाबचा या सिझनमधील हा दुसरा विजय आहे.

शशांक सिंह ठरला हिरो

गुजरात टायटन्सनं दिलेल्या 200 रन्सचा पाठलाग करताना पंजाबची अवस्था 4 आऊट 70 अशी झाली होती. त्यावेळी शशांक पंजाबच्या मदतीला धावला. त्यानं फक्त 29 बॉलमध्ये नाबाद 61 रन्स (6 फोर, 4 सिक्स) काढले. शशांकनं नवोदित आशुतोष शर्मासोबत सातव्या विकेटसाठी 22 बॉलमध्ये 43 रनची भागीदारी करत पंजाबला विजयाच्या जवळ नेलं. आशुतोष आऊट झाल्यानंतरही शशांक थांबला नाही. तो पंजाबला विजयासाठी दिलेलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतरच पॅव्हिलियनमध्ये परतला.

ऑक्शनमध्ये झाला होता गोंधळ

पंजाब किंग्जच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शशांकचा टीममधील प्रवेश सहज झाला नाही.

या सिझनपूर्वी झालेल्या ऑक्शनमधील शेवटच्या टप्प्यात शशांकचं नाव पुकारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला खरेदी केल्यानंतर पंजाब किंग्जचे सहमालक प्रिती झिंटा आणि नेस वाडिया गोंधळलेले दिसले होते.

त्यांनी शशांकला चुकून खरेदी केलं असं वाटलं होतं. अखेर, पंजाब किंग्जला त्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली होती. शशांकनंही माझ्यावर विश्वादाखवल्याबद्दल आभार, अशी भावना त्यावर व्यक्त केली. पंजाबनं दाखवलेला तो विश्वास शशांकनं सार्थ ठरवला. 

Advertisement

मुंबईशी कनेक्शन

पंजाबच्या विजयाचा हिरो ठरलेला शशांक हा मुळचा मुंबईकर आहे. 'इएसपीएन क्रिकइन्फो' नं दिलेल्या माहितीनुसार आक्रमक खेळामुळे त्यानं मुंबईतील कांगा लीगमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली होती. पण, त्याला मुंबईच्या टीममध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यानं कंटाळून मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पुदुच्चेरीकडून एक सिझन खेळल्यानंतर तो सध्या छत्तीसगडकडून खेळतोय. 

शशांकनं 59 टी20 मॅचमध्ये 141 च्या स्ट्राईक रेटनं 815 रन केले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगडनं मुंबईवर मिळवलेल्या विजयातही त्याचं मोठं योगदान होतं. त्याचबरोबर लिस्ट A क्रिकेटमधील एकाच सामन्यात 150 पेक्षा जास्त रन्स आणि 5 विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय आहे. 

Advertisement

पंजाब किंग्जपू्र्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स (तेंव्हाचे नाव), राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल टीमचंही त्यानं प्रतिनिधित्व केलं आहे. 
 

Topics mentioned in this article