IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Delhi Capitals vs Mumbai Indians) या सामन्यात दिल्लीनं जोरदार सुरुवात केलीय. दिल्लीनं या सामन्यात पहिल्या 6 ओव्हर्सच्या पॉवर प्लेमध्ये तब्बल 92 रन्स काढले. दिल्लीच्या या जबरदस्त सुरुवातीचा हिरो होता जेक फ्रेझर-मॅकगर्क. आयपीएल 2024 मध्ये सर्वांना प्रभावित करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या या तरुण खेळाडूचा समावेश आहे. तो दिल्ली कॅपिटल्समध्ये बदली खेळाडू म्हणून आला आणि त्यानं फक्त 5 मॅचमध्ये स्वत:चा मोठा ठसा उमटवलाय.
दिल्लीची दमदार सुरुवात
दिल्ली कॅपिटल्सला 'प्ले ऑफ' साठीचं आव्हान कायम राखण्यासाठी आता प्रत्येक मॅच जिंकणं आवश्यक आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या मैदानात सुरु असलेल्या मॅचमध्ये दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण मिळालं. जेक फ्रेझरनं सुरुवातीपासूनच मुंबईच्या बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं. त्यानं फक्त 15 बॉलमध्ये 8 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जेकचा स्पीड पन्नाशीनंतरही कायम होता. तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरीचा रेकॉर्ड करणार असे वाटत होते. अखेर पियूष चावलानं त्याला 84 रनवर आऊट केलं. हे रन त्यानं फक्त 27 बॉलमध्येच 11 फोर आणि 6 सिक्सच्या जोरावर काढले. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट होता 311.11
जेकनं या आयपीएल सिझनमध्ये आत्तापर्यंत 5 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 237.50 च्या स्ट्राईक रेटनं 247 रन्स केले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
29 बॉलमध्ये शतक
जगभरातील क्रिकेट पाहणाऱ्या फॅन्ससाठी जेक फ्रेझर हे नाव नवं नाही. ऑस्ट्रेलियाचा उद्याचा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातंय. सर्वात जलद शतकाचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्यानं फक्त 29 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. फ्रेझरनं दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना तास्मानियाविरुद्ध हा विक्रम केला होता. त्यापूर्वी हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलनं 30 बॉलमध्ये आयपीएल स्पर्धेत शतक झळकावलं होतं.
( नक्की वाचा : 'मुंबई इंडियन्सकडून खेळलात तर डोकं फुटून जाईल', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा )
माकडानं घेतला होता चावा
2020 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियन टीमचाही जेक सदस्य होता. पण, त्याला वर्ल्ड कपमध्ये फार कमाल करता आली नव्हती. भारताविरुद्धच्या मॅचमध्ये तो शून्यावर परतला होता. त्यानंतर माकडानं चावा घेतल्यानं त्याच्यावर वर्ल्ड कप सोडण्याची वेळ आली होती.
अंडर 19 वर्ल्ड कपमधील निराशेनंतर जेकनं स्वत:ला सिद्ध केलंय. त्यानं आत्तापर्यंत 41 टी20 मॅचमध्ये 144.28 च्या स्ट्राईक रेटनं 808 रन केले आहेत. दोन वन-डे मॅचमध्येही त्यानं ऑस्ट्रेलियन टीमचं प्रतिनिधित्व केलं असून त्यामध्ये 51 रन केले आहेत. आगामी T20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा ओपनर म्हणून त्याचं नाव घेतलं जातंय.