T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया अडचणीत

T20 World Cup 2024 : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये फॉर्मात असलेल्या खेळाडूची बॅट सध्या त्याच्यावर रुसलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
T20 World Cup 2024 Team India

Yashasvi Jaiswal IPL 2024 : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालची बॅट सध्या त्याच्यावर रुसलीय. आयपीएल 2024 मधील पहिल्या 4 लढतीत  त्यानं फक्त 39 रन केले आहेत.  आयपीएलपूर्वी जैस्वालची आगामी टी20 वर्ल्ड कपमधील जागा निश्चित मानली जात होती. पण, सध्याच्या खराब फॉर्ममुळे माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. 

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर आणि न्यूझीलंडचा माजी फास्ट बॉलर मिचेल मॅक्लेनाघन यांनी जैस्वालच्या फॉर्मबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. 'जैस्वालवर पहिल्या बॉलपासून रन काढण्याची जबाबदारी लादण्यात आली आहे', असं मत जाफरनं 'क्रिकबझ'शी बोलताना व्यक्त केलं. जैस्वाल सेट होण्यासाठी वेळ घेतो, असं निरिक्षण जाफरनं व्यक्त केलंय. राजस्थान रॉयल्सचा दुसरा सलामीवीर जोस बटलर फॉर्ममध्ये परतलाय. त्यामुळे जैस्वालला सेट होण्यासाठी वेळ घेता येईल. त्यानंतर तो नैसर्गिक खेळ करु शकेल, अशी आशा जाफरनं व्यक्त केली. 

मिचेल मॅक्लेनाघनला मात्र जाफरचं हे मत फारसं मान्य नाही. 'जैस्वालनं आक्रमक खेळ कायम ठेवावा. टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला त्याच्याकडून याच पद्धतीचा खेळ अपेक्षित आहे,' असं त्यानं सांगितलं.  

टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024)  2 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये होणार आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा हा कॅप्टन असल्याची घोषणा बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यापूर्वीच केली आहे. रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार होण्यासाठी सध्या स्पर्धा सुरु आहे. त्यावेळी जैस्वालचा सध्याचा फॉर्म भारतीय टीमसमोरची मोठी अडचण बनलाय. 

Advertisement