IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स (CSK) सध्या कठीण काळातून जात आहे. कर्णधार एम. एस. धोनी आधीच दुखापतीमुळे मैदानाबाहेर असताना, आता युवा फलंदाज आयुष म्हात्रे याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे 3 आठवड्यांसाठी संघाबाहेर राहावे लागणार आहे. एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, म्हात्रे 10 मेपर्यंत कोणताही सामना खेळू शकणार नाही. ज्यामुळे सीएसकेच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीएसकेच्या डावातील 5 व्या ओव्हरमध्ये आयुष म्हात्रेची हॅमस्ट्रिंग खेचली गेली. वेदना असूनही त्याने फलंदाजी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुखापतीमुळे त्याला फटकेबाजी करताना अडचण आली आणि लवकरच तो बाद झाला.
आयुष म्हात्रेचा आतापर्यंतचा प्रवास
आयुष म्हात्रेने या हंगामात सीएसकेसाठी महत्त्वाची कामगिरी केली होती. त्याने पंजाब किंग्सविरोधात 73 धावांची तुफानी खेळी केली होती. दिल्ली कॅपिटल्सविरोधातही अर्धशतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. केकेआरविरोधातही 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. फॉर्ममध्ये असताना दुखापत झाल्याने प्रशिक्षक माइक हसी यांनीही याला संघासाठी मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.
(नक्की वाचा- T20 Captaincy: सूर्याचे कर्णधारपद धोक्यात? 'हे' 5 खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत, BCCI मोठा निर्णय घेणार)
सीएसकेच्या अडचणीत वाढ
चेन्नईने आतापर्यंत 6 पैकी केवळ 2 सामने जिंकले असून 4 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 4 गुणांसह ते गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहेत. आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत चेन्नईला पुढील 5 महत्त्वाच्या सामन्यांत आपली रणनीती बदलावी लागणार आहे.
सीएसकेचे आगामी सामने
- 23 एप्रिल: मुंबई इंडियन्स
- 26 एप्रिल: गुजरात टायटन्स
- 2 मे: मुंबई इंडियन्स
- 5 मे: दिल्ली कॅपिटल्स
- 10 मे: लखनऊ सुपर जायंट्स