IPL 2026 GT vs RCB : आयपीएल 2026 मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं आरसीबीचा 4 विकेट्सनं पराभव केला. आरसीबीचा पराभव झाला असला तरी विराट कोहलीनं या मॅचमध्ये एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे.
आयपीएल 2026 च्या हंगामात विराट कोहलीची बॅट जोरदार तळपत आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या 42 व्या सामन्यात विराटने केवळ 28 रन्सची खेळी केली असली, तरी या छोट्या खेळीत त्याने क्रिकेट जगतातील एक असा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे जो आजवर कोणालाही जमलेला नाही. आशियाई भूमीवर टी20 क्रिकेटमध्ये 12000 रन्सचा टप्पा ओलांडणारा विराट कोहली हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे.
आशियाई भूमीवर किंग कोहलीचा दबदबा
विराट कोहलीने आशियामध्ये खेळताना आपल्या 340 व्या डावात हा 12000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. टी20 क्रिकेटच्या इतिहासात आशिया खंडात इतक्या धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. विराटनंतर या यादीत शोएब मलिक आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक लागतो, मात्र ते विराटाच्या तुलनेत खूप मागे आहेत.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
आशियामध्ये सर्वाधिक टी20 रन्स करणारे खेळाडू
12012 - विराट कोहली (340 डाव)
10252 - शोएब मलिक (380 डाव)
10023 - रोहित शर्मा (367 डाव)
9243 - बाबर आझम (249 डाव)
8972 - डेव्हिड वॉर्नर (257 डाव)
8930 - शिखर धवन (297 डाव)
8270 - सूर्यकुमार यादव (302 डाव)
8106 - संजू सॅमसन (298 डाव)
7988 - ख्रिस गेल (236 डाव)
7628 - केएल राहुल (209 डाव)
रबाडा विरुद्ध कोहलीचा थरार
या सामन्यात चाहत्यांना कागिसो रबाडा आणि विराट कोहली यांच्यातील जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळाले. आरसीबीच्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये विराटने रबाडाच्या चेंडूंवर सलग 5 चौकार ठोकून मैदानावर खळबळ उडवून दिली. कोहलीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा काही काळ हतबल झाला होता. मात्र, रबाडाने आपल्या पुढच्या षटकात जबरदस्त पुनरागमन केले.
विराटची विकेट आणि निराशा
रबाडाने कोहलीचा बदला घेण्यासाठी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. स्टंपच्या लाईनमध्ये आलेल्या शॉर्ट चेंडूवर विराटने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतल्यामुळे तो बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि हवेत गेला. शॉर्ट मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रशीद खानने कोणतीही चूक न करता एक शानदार झेल घेतला. केवळ 13 चेंडूत 28 धावा करून विराट बाद झाला. बाद झाल्यानंतर तो स्वतःवर अत्यंत नाराज दिसत होता आणि रागातच मैदानाबाहेर गेला.
450 सिक्सर्सचा टप्पा पार
या सामन्यातील कामगिरीसह विराटने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या 450 षटकारांचा टप्पा देखील गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो रोहित शर्मा नंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीयांच्या यादीत रोहित शर्मा अजूनही अव्वल स्थानी आहे, मात्र कोहलीने या विक्रमासह आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.