जाहिरात

Ajinkya Rahane: केकेआरच्या कॅम्पमध्ये अस्वस्थता? सलग 2 पराभवांनंतर कॅप्टन रहाणेचा पारा चढला, वाचा काय घडलं?

Ajinkya Rahane: आयपीएल 2026 च्या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का बसल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संयम सुटला आहे.

Ajinkya Rahane: केकेआरच्या कॅम्पमध्ये अस्वस्थता? सलग 2 पराभवांनंतर कॅप्टन रहाणेचा पारा चढला, वाचा काय घडलं?
Ajinkya Rahane: केकेआरच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे. @BCCI-IPL
मुंबई:

Ajinkya Rahane: आयपीएल 2026 च्या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का बसल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संयम सुटला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर रहाणेने आपल्या टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला असून, 'काही लोक माझ्या यशावर जळतात' असे खळबळजनक विधान त्याने केले आहे. आपल्या ऐतिहासिक 200 व्या आयपीएल मॅचमध्ये संघाला विजय मिळवून देता न आल्याने निराश झालेल्या रहाणेने प्रेस कॉन्फरन्समध्ये संताप व्यक्त केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

इडन गार्डन्सच्या मैदानावर 2 एप्रिल रोजी झालेल्या या मॅचमध्ये हैदराबादने केकेआरचा 65 रनने पराभव केला. या पराभवानंतर जेव्हा पत्रकारांनी रहाणेला त्याच्या बॅटिंग फॉर्म आणि स्ट्राइक रेटबद्दल विचारले, तेव्हा तो चिडला. रहाणेने थेट नाव न घेता म्हटले की, जे लोक माझ्या खेळावर टीका करत आहेत, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी वेगळाच अजेंडा आहे. त्यांना मी खेळताना बघणे आवडत नाही आणि कदाचित माझ्या यशाचा त्यांना हेवा वाटतो.

( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )

स्ट्राइक रेटच्या टीकेवर रहाणेचे प्रत्युत्तर

या मॅचमध्ये 227 रनच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रहाणे 10 बॉलमध्ये फक्त 8 रन करून आऊट झाला. त्याच्या या संथ खेळीवर टीका होत असताना रहाणे म्हणाला की, माझा स्ट्राइक रेट आतापर्यंत सर्वोत्तम राहिला आहे. जे लोक माझ्याबद्दल बोलत आहेत, ते कदाचित मॅच नीट बघत नाहीत. मला मिळालेल्या यशावर जळणाऱ्यांची मला अजिबात चिंता नाही. एका खराब खेळीमुळे माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे, असेही त्याने ठणकावून सांगितले.

टीकाकारांना सडेतोड उत्तर

रहाणे पुढे म्हणाला की, टीकाकारांना अशी अपेक्षा नव्हती की अजिंक्य रहाणे आपल्या खेळात इतकी मोठी सुधारणा करेल. त्यामुळे ते माझ्याबद्दल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीही बोलत असले तरी मला आनंदच आहे, कारण किमान ते माझ्याबद्दल बोलत तरी आहेत. फिन एलनसोबतची माझी पार्टनरशिप चांगली होती आणि माझा हेतू स्पष्ट होता. कधीकधी बॅटरला तो फ्लो मिळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्याला खेळ समजत नाही.

( नक्की वाचा : LSG vs DC : ही कसली जादू ! दिल्लीच्या नव्या हिरोनं टाकला IPL 2026 मधील सर्वात घातक बॉल! VIDEO पाहातच राहाल )

कशी झाली मॅच?

या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने प्रथम बॅटिंग करताना 8 विकेट गमावून 226 रनचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 16 ओव्हरमध्ये फक्त 161 रनवर ऑल आऊट झाला. केकेआरकडून अंगकृष रघुवंशीने हाफ सेंच्युरी झळकावली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. हैदराबादकडून नीतीश कुमार रेड्डीने 39 रन आणि 2 विकेट घेत ऑल राऊंड कामगिरी केली, तर ब्लेसिंग मुजारबानी 4 विकेट घेत केकेआरचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com