Rohit Sharma Ayush Mhatre Meeting : आयपीएल 2026 मधील शुक्रवारचा सामना मुंबईचा तरुण बॅटर आयुष म्हात्रेनं गाजवला. चेन्नई सुपर किंग्सच्या वतीने खेळताना अंडर-19 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन आयुष म्हात्रे याने पंजाब किंग्जविरुद्ध दमदार बॅटिंग करत त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवली. या दिमाखदार खेळीनंतर आयुष आणि त्याचा आदर्श रोहित शर्मा यांच्यातील भेटीचा एक भावूक किस्सा आता चर्चेत आला आहे. विरारच्या या मुलानं त्याच्या 'आयडॉल'ला भेटण्यासाठी घेतलेले कष्ट आणि रोहितने दिलेला दोन तासांचा वेळ, हा प्रवास कोणत्याही क्रिकेट चाहत्याला प्रेरणा देणारा आहे.
पंजाबविरुद्ध आयुषची वादळी खेळी
आयुष म्हात्रेने पंजाब किंग्जच्या बॉलरची अक्षरशः पळता भुई थोडी केली. त्याने केवळ 29 बॉलमध्ये आपले हाफ सेंच्युरी पूर्ण केली. मार्कस स्टोइनिसच्या बॉलवर सिक्सर लगावत त्यानं हाफ सेंच्युरी पूर्ण केली. आयुषने एकूण 43 बॉलमध्ये 73 रन्सची आक्रमक खेळी केली, ज्यामध्ये 6 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. संजू सॅमसन लवकर आऊट झाल्यानंतर आयुषने कॅप्टन रुतुराज गायकवाडसोबत दुसऱ्या विकेटसाठी 55 बॉलमध्ये 96 रनची पार्टनरशिप केली. या भागीदारीत आयुषचा वाटा तब्बल 67 रनचा होता, ज्यावरून त्याच्या आक्रमक बॅटिंगचा अंदाज येतो.
Ayush Mhatre motoring along! 🏎️
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026
The youngster putting wheels to @ChennaiIPL's innings 🔥#CSK 57/1 after the Powerplay.
Updates ▶️ https://t.co/riWrE2EZiF#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvPBKS pic.twitter.com/UyJtggrhxT
व्हिडिओ कॉल नको, प्रत्यक्ष भेटायचंय!
आयुष म्हात्रेने रोहित शर्मासोबतच्या भेटीचा किस्सा सांगताना याला आयुष्यातील 'ड्रीम डे' म्हटले आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी आयुषने रोहितला एक मेसेज केला होता. रोहितने केवळ मेसेजला उत्तर दिले नाही, तर स्वतः आयुषला कॉल केला.
रोहितने विचारले, तुला काय सांगायचे आहे? तेव्हा आयुषने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रोहितने विचारले, तू कुठे राहतोस? आयुषने 'विरार' असे उत्तर दिल्यावर रोहित म्हणाला, तू विरारवरून मला भेटायला येशील का? त्यावर आयुषने उत्तर दिले की, माझ्या आदर्श व्यक्तीला भेटण्यासाठी मी कुठेही येऊ शकतो. रोहितने व्हिडिओ कॉलचा पर्यायही दिला होता, पण आयुषला प्रत्यक्ष भेटायचे होते.
( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )
रोहितच्या घरी दोन तास गप्पा
ठरल्याप्रमाणे आयुष दुसऱ्या दिवशी रोहित शर्माच्या घरी पोहोचला. तिथे या दोघांमध्ये सुमारे 2 तास क्रिकेट आणि बॅटिंग स्किल्सवर चर्चा झाली. आयुष म्हणाला, दोन तास कसे निघून गेले हे मला कळलेच नाही. माझ्यासारख्या तरुण खेळाडूला रोहित भाईने इतका वेळ दिला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आयुष रोहितला त्याचा रोल मॉडेल मानतो. एकदा रणजी ट्रॉफी मॅचमध्ये रोहितचं टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे आयुषला आपली जागा सोडावी लागली होती, तेव्हाही त्याने रोहितबद्दल आदर व्यक्त करणारी भावूक पोस्ट लिहिली होती.
अंडर-19 वर्ल्ड कपचा हिरो आता आयपीएलमध्ये
आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय अंडर-19 टीमने यावर्षी वर्ल्ड कप जिंकला आहे. आयपीएल 2026 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो शून्यावर आऊट झाला होता, पण पंजाबविरुद्धच्या आजच्या खेळीने त्याने दमदार पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, त्याचा आदर्श रोहित शर्मादेखील फॉर्मात असून त्याने कोलकाताविरुद्ध 78 रनची शानदार इनिंग खेळली आहे. गुरु-शिष्याची ही जोडी सध्या आयपीएल गाजवत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world