IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 64 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजाने मैदानात चौफेर फटकेबाजी करत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) दिलेल्या 221 धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना वैभवने अवघ्या 38 चेंडूत 93 धावा कुटल्या. या वादळी खेळीनंतर त्याचे एक मोठे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
केवळ 38 चेंडूत 93 धावांचा पाऊस
लखनऊच्या गोलंदाजांचा समाचार घेताना वैभव सूर्यवंशीने मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीत 10 गगनचुंबी षटकार आणि 7 कडक चौकार मारले. दुर्दैवाने तो आपले शतक केवळ 7 धावांनी मुकला, मात्र बाद होण्यापूर्वी त्याने राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा भक्कम पाया रचला होता. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काय होती वैभवची रणनीती?
सामन्यानंतर आपल्या रणनीतीचा खुलासा करताना वैभव म्हणाला, "काही खास नाही. मी जेव्हा गोलंदाजीदरम्यान बाहेर बसलो होतो, तेव्हाच खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असल्याचे माझ्या लक्षात आले होते. मी ठरवले होते की सुरुवातीला घाई करायची नाही, थोडा वेळ घ्यायचा. मी जितका जास्त वेळ क्रीजवर राहीन, तितकी दुसऱ्या टोकावरील फलंदाजाला मदत होईल."
(नक्की वाचा- Gurnoor Brar : 4 वर्षात 1 आयपीएल सामना खेळलेल्या गुरनूर ब्रारची थेट टीम इंडियात निवड का झाली?)
सुरुवातीला संथ खेळल्यानंतर अचानक गिअर बदलण्याबाबत तो म्हणाला, "मला माहित आहे की मी कधीही दोन-तीन चौकार किंवा षटकार मारू शकतो. त्यामुळे सुरुवातीला वेळ घेऊन सामना शेवटपर्यंत कसा नेता येईल, हाच माझा विचार होता."
"माझे पूर्ण लक्ष फक्त माझ्या खेळावर..."
इतक्या लहान वयात मिळणाऱ्या अफाट लोकप्रियतेबद्दल विचारले असता वैभवने अत्यंत समजूतदारपणे उत्तर दिले. तो म्हणाला, "मी या गोष्टींवर जास्त लक्ष देत नाही. मी वृत्तपत्रे किंवा सोशल मीडियावरील गोष्टी वाचत नाही, त्यामुळे मी याबद्दल विचारही करत नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. जर माझे करिअर मोठे राहिले आणि मी प्रदीर्घ काळ खेळत राहिलो, तर लोक अजून बरेच काही बोलतील. माझे पूर्ण लक्ष फक्त माझ्या खेळावर आणि माझ्या प्रवासावर असले पाहिजे."