Sanju Samson : संजू सॅमसननं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दमदार खेळी केली.
मुंबई:
IPL 2026, DC vs CSK : आयपीएल 2026 मध्ये मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना झाला. आयपीएलच्या 'प्ले ऑफ' मध्ये जाण्यासाठी दोन्ही टीम्सना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यात सीएसकेनं सरशी साधली आहे. संजू सॅमसनच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर सीएसकेनं हा सामना 8 विकेट्सनं सहज जिंकला. सीएसकेच्या या विजयानंतर आयपीएल प्ले ऑफचं समीकरण आणखी चुरशीचं झालं आहे.
काय आहे समीकरण?
चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील हा पाचवा विजय आहे. सीएसकेनं या सिझनमध्ये आत्तापर्यंत पाच विजय मिळवले असून तेवढ्याच सामन्यात पराभव पत्कारला आहे. पाच विजयासह सीएसकेचे आता 10 पॉईंट्स झाले आहेत. पॉईंट टेबलमध्ये सीएसके सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत. सीएसकेचे अद्यापच चार सामने बाकी आहेत.
यापैकी दोन सामने हे लखनौ सुपर जायंट्स हे सर्वात तळाच्या टीमविरुद्ध आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्ससोबत एक-एक सामना बाकी आहे. हे सर्व सामने जिंकले तर सीएसकेचा प्ले ऑफमध्ये 18 पॉईंट्सह नक्की पोहोचेल.
सीएसकेनं चारपैकी तीन सामने जिंकले तरी 16 पॉईंट्सह ते प्ले ऑफमध्ये जाऊ शकतात.
( नक्की वाचा : कोण आहे Raghu Sharma? 102 किलो वजन ते मुंबई इंडियन्सचा मॅच विनर; एका लेग स्पिनरच्या जिद्दीची फिल्मी कहाणी सीएसकेचा कुणाला धोका?
आयपीएल 2026 मध्ये 48 व्या सामन्यानंतर पहिल्या क्रमांकावर पंजाब किंग्सची (9 सामने 13 पॉईंट्स) टीम आहे. आरसीबीची टीम 9 सामन्यात 12 पॉईंट्सह दुसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद 10 सामन्यात 12 पॉईंट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सची टीमचेही 10 सामन्यानंतर 12 पॉईंट्स आहेत.
पण, राजस्थानचा रनरेट सनरायझर्सपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांचा सध्या चौथा क्रमांक आहे.
सीएसकेच्या दिल्लीवरील विजयानंतर या चारही टीमना सावधगिरीचा इशारा दिलाय. त्यांना आता उर्वरित प्रत्येक सामना संपूर्ण शक्तीसह आणि गांभीर्यानं खेळावा लागेल. कारण त्यांची कोणतीही चूक त्यांना अडचणीत आणू शकते.
गुजरात टायटन्सची टीमही 10 सामन्यात 12 पॉईंट्सह पाचव्या क्रमांकावर आहे. पण त्यांचा रनरेट हा मायनसमध्ये आहे. त्यामुळे सीएसकेच्या या विजयानंतर गुजरात टायटन्सची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
दिल्ली कॅपिटल्सची निराशा
आयपीएल 2026 ची दमदार सुरुवात केलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं या सामन्यातही निराशा केली. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला 7 आऊट 155 रन्स करता आले.
दिल्लीची अवस्था एकवेळ 5 आऊट 69 अशी झाली होती. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी दिल्लीची इनिंग सावरला. स्टब्सनं 38 तर समीरनं नाबाद 40 रन्स केले. या दोघांच्या खेळीमुळे दिल्लीनं दिडशेचा टप्पा ओलांडला. पण, त्यांचे प्रयत्न दिल्लीला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.