IPL 2026: आयपीएल 2026 च्या पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत मैदानावर मोठा ड्रामा झाला. गुवाहाटीमध्ये झालेल्या या मॅचमध्ये रवींद्र जडेजानं आपला जुना सहकारी शिवम दुबेला आऊट केल्यानंतर दिलेला खतरनाक सेंड ऑफ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जडेजानं एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेऊन चेन्नईच्या अडचणीत मोठी भर घातली. सरफराज खानला आऊट केल्यानंतर मैदानात आलेल्या शिवम दुबेनं आक्रमक पवित्रा घेतला होता, पण जडेजानं त्याला जाळ्यात अडकवलं.
नेमकं काय घडलं?
टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजेतेपदात महत्त्वाचा वाटा असलेल्या शिवम दुबेकडून सीएसकेला मोठ्या आशा होत्या. दुबेनं आल्या आल्या जडेजाला जोरदार सिक्स लगावला. पण, जडेजानं लगेचच चतुर बॉलिंग करत पुनरागमन केलं. जडेजानं त्याच्या बॉलिंगचा वेग बदलला आणि खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत दुबेला चुकीचा शॉट खेळायला भाग पाडलं.
लाँग-ऑफला सोपा कॅच देऊन दुबे 4 बॉलमध्ये फक्त 6 रन काढून आऊट झाला. दुबे पॅव्हेलियनकडे परतत असताना जडेजानं दिलेली रिॲक्शन खूप काही सांगून जाणारी होती. जडेजानं ज्या प्रकारे आक्रमकपणे आपल्या माजी सहकाऱ्याला निरोप दिला त्यावरुन हा सामना त्याच्यासाठी किती महत्त्वाचा होता, हे स्पष्ट झालं. या स्पेलमध्ये जुन्या फॉर्ममध्ये असलेला जडेजा पाहायला मिळाला, ज्यानं त्याच्या स्पिनच्या मोबदल्यात मॅचचं पारडं राजस्थानच्या बाजूनं झुकवलं.
सीएसकेला करुन दिली जाणीव
रविंद्र जडेजासाठी हा सामना अत्यंत इमोशनल होता. रविंद्र जडेजा गेली कित्येक वर्ष सीएसकेचा आधारस्तंभ होता. पण, या सिझनपूर्वी संजू सॅमसनला खरेदी करण्यासाठी सीएसकेनं त्यांचा हुकमी एक्का राजस्थानला पाठवला. आपल्याला राजस्थानला पाठवून चूक केली हेच जडेजानं पहिल्याच ओव्हरमध्ये सीएसकेला दाखवून दिलं.