IPL 2026 News : आयपीएल 2025 विजेत्या त्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (RCB ) त्यांच्या फॅन्सबद्दलच्या आदराचं आणि माणुसकीचं एक नवं उदाहरण जगासमोर ठेवलंय. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ज्या 11 चाहत्यांनी आपला जीव गमवाला, त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 जागा या हंगामात कायमस्वरूपी रिकाम्या ठेवण्याचा अत्यंत भावनिक निर्णय संघ प्रशासनाने घेतला आहे. खेळाडूंच्या जर्सीपासून ते मैदानातील आसनव्यवस्थेपर्यंत, आरसीबीचा हा संपूर्ण हंगाम आपल्या त्या 'अमर' फॅन्सना समर्पित असणार आहे.
विजेतेपदाचा आनंद आणि तो काळा दिवस
आरसीबीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि तितकाच वेदनादायी टप्पा आहे. 3 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्सचा 6 रनने पराभव करून आरसीबीने आपले पहिले आयपीएल जेतेपद पटकावले होते. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून 2025 रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर तब्बल 3,00,000 चाहत्यांची अलोट गर्दी उसळली होती.
दुर्दैवाने या गर्दीत मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यात 11 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला आणि 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. ज्या चाहत्यांच्या जोरावर संघाने जेतेपद मिळवले, त्यांनाच अशा प्रकारे गमावल्याचे शल्य आजही आरसीबी व्यवस्थापनाच्या मनात कायम आहे.
( नक्की वाचा : Anaya Bangar:'वेळ लागला पण.' ऑपरेशननंतर अनाया बांगरची वडिलांसाठी भावूक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याचा नवा प्रवास )
11 नंबरची जर्सी आणि काळी फित लावून श्रद्धांजली
आरसीबीचे सीईओ राजेश मेनन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या विशेष उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्या 11 चाहत्यांनी जीव गमावला त्यांच्या आठवणीत सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडू 11 नंबरची जर्सी परिधान करतील. सामन्याच्या दिवशी देखील खेळाडू आपल्या हातावर काळी फित बांधून मैदानात उतरतील.
सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 11 जागा कधीही कोणालाही विकल्या जाणार नाहीत. या जागा कायम रिकाम्या राहतील, जेणेकरून ते 11 चाहते कायम आपल्यासोबत आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात राहील.
स्टेडियमची सुरक्षा आणि नवी सुरुवात
या भीषण घटनेमुळे बंगळुरूला 2025 चा महिला वनडे वर्ल्ड कप आणि 2026 चा पुरुष टी-20 वर्ल्ड कप यांसारख्या मोठ्या स्पर्धांच्या यजमानपदाला मुकावे लागले होते. मात्र, त्यानंतर माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर स्टेडियमच्या सुरक्षेत आमूलाग्र बदल केले आहेत.
स्टेडियमचे प्रवेशद्वार 9 मीटरने रुंद करण्यात आले असून, 6 ते 13 नवीन गेट्स तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात 500 सीसीटीव्ही कॅमेरे आणि क्यूआर कोड आधारित ई-तिकीट प्रणाली लागू करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या समितीने सुरक्षा ऑडिट पूर्ण केल्यानंतरच आता येथे सामने खेळवण्यास परवानगी दिली आहे.
जेतेपद राखण्यासाठी आरसीबी सज्ज
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ 28 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर मोहिमेची सुरुवात करणार आहे. या हंगामात आरसीबी त्यांचे 5 सामने बंगळुरूमध्ये तर 2 सामने रायपूरमध्ये खेळणार आहे. आपल्या लाडक्या चाहत्यांच्या आठवणी उराशी बाळगून मैदानात उतरणारा आरसीबीचा संघ हे विजेतेपद पुन्हा एकदा पटकावून आपल्या त्या 11 चाहत्यांना खरी श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world