Riyan Parag Angry onVaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 चा क्वालिफायर-2 सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय वंडर बॉय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगची ताकद दाखवत अवघ्या 47 चेंडूंत 96 धावा कुटल्या. परंतु, तो बाद झाल्यावर डगआऊटमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने त्याला दिलेल्या वागणुकीमुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर कर्णधार रियान परागला चाहत्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागत आहे.
शतक हुकल्यावर सहानभूतीऐवजी ओरडा!
वैभव सूर्यवंशीने 204.26 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 8 चौकार आणि 7 षटकार ठोकले. दुर्दैवाने, कागिसो रबाडाच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने त्याचा झेल घेतल्यामुळे त्याचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले.
प्रेक्षकांकडून टाळ्या, कॅप्टनकडून राग
वैभव शतक न झाल्यामुळे स्वतःवरच प्रचंड नाराज आणि दुःखी होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता. त्यावेळी संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. मात्र, डगआऊटमध्ये पोहोचताच कर्णधार रियान परागने त्याच्याशी अत्यंत रागात आणि काहीतरी सुनावण्याच्या थाटात संवाद साधला. रियान परागच्या या रागीट हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. चाहत्यांना 15 वर्षांच्या वैभवसोबत कर्णधाराने केलेले हे वर्तन अजिबात आवडलेले नाही.
(नक्की वाचा- Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर)
सोशल मीडियावर नेटकरी भडकले
राजस्थान रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर चाहत्यांनी पराभवाचे खापर रियान परागवर फोडले आहे. त्याचं कर्णधारपदावर आधीच प्रश्नचिन्ह असताना, वैभवला ओरडल्यामुळे ट्रोलिंग तीव्र झाली आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना लिहिले, "स्वतः दबावाच्या सामन्यांमध्ये फ्लॉप होतो आणि अप्रतिम खेळणाऱ्या दुसऱ्या खेळाडूंवर लायकी नसताना ओरडतो." या महत्त्वपूर्ण सामन्यात रियान परागने 6 चेंडूंत फक्त 11 धावा केल्या.
(नक्की वाचा- Nagpur News: गॅस सिलिंडरची कटकट संपणार? कचऱ्यापासून तयार होणार 'बायोगॅस', नागपुरात देशातील पहिला प्रकल्प सज्ज मात्र रियान पराग वैभवशी कोणत्या कोणत्या विषयावर अशा पद्धतीने बोलत होता, हे अद्याप समोर आलेले नाही. कदाचित वैभवने संयमी खेळी करत शतक साजरं करायला हवं होतं, अशी अपेक्षा देखील रियानने बोलून दाखवली असवी. त्यामुळे रियानचा वैभवसोबत अशापद्धतीने बोलण्याचा हेतू काय होता, याबद्दल आताच अंदाज लावता येणार नाही.