Nagpur Biogas Project: देशापुढे उभ्या ठाकलेल्या इंधन आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातून एक अत्यंत सकारात्मक आणि देशासाठी दिशादर्शक ठरवणारी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या भांडेवाडी येथे देशातील पहिला कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायो गॅस (CBG) निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू असून, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल.
या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व नागपूरच्या भांडेवाडी येथील या प्रकल्पाला भेट देत संपूर्ण कामाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात सध्या प्रायोगिक तत्त्वावर गॅस निर्मितीचे काम यशस्वीरित्या सुरू झाले आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर)
नेदरलँड्सच्या तंत्रज्ञानाने उभारला प्रकल्प
- आंतरराष्ट्रीय भागीदारी: नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प नेदरलँड्समधील 'सुस बी डी' या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहाय्याने उभा केला आहे.
- शून्य आर्थिक भुर्दंड: या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिका किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला एक रुपयाचाही आर्थिक खर्च करावा लागलेला नाही. उलट, शहरासमोरील कचऱ्याची आणि प्रदूषणाची मोठी समस्या विनामूल्य सुटण्यास मदत झाली आहे.
- संपूर्ण कचऱ्याचा पुनर्वापर: नागपूर शहरात दररोज जेवढा घरगुती ओला व सुका कचरा निर्माण होतो, तो सर्व कचरा गोळा करून हा प्रकल्प गॅस निर्मिती करणार आहे. यामुळे डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे ढिगारे साचणार नाहीत.

देशातील अन्य 11 शहरांमध्येही राबवणार पॅटर्न
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि गॅस पुरवठ्यातील अनिश्चितता पाहता, हा प्रकल्प भारतासाठी ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने 'गेम चेंजर' ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 'एनडीटीव्ही मराठी'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरचा हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, केंद्र सरकार देशातील इतर महत्त्वाच्या 11 शहरांमध्येही याच धर्तीवर कचऱ्यापासून सीबीजी (CBG) निर्मितीचे प्रकल्प राबवण्याचा गंभीर विचार करत आहे.
(नक्की वाचा- Nagpur News : पु. ल. देशपांडेंच्या सूनबाईंनी शोधला घन कचरा व्यवस्थापनाचा उपाय ! नागपूर पॅटर्नची देशभर चर्चा)
या प्रकल्पामुळे कचऱ्यापासून केवळ हरित इंधन मिळणार नाही, तर शहरांमधील वायू आणि भूमी प्रदूषण कमी होऊन नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासही मोठी मदत होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world