आयपीएलच्या लिलावासाठी सर्वच फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सचे हेमांग बदानीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. तर कर्णधार बदलाबाबतची आता चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार, यष्टिरक्षक ऋषभ पंतची पुन्हा कर्णधारपदी निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे. ऋषभ पंतची 2021 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडे रिटेन्शनसाठी संभाव्य खेळाडूंच्या नावांची चर्चा होत असताना, कर्णधारपदासाठी पंतचे नाव आघाडीवर होते. मात्र आता हे समीकरण बदलताना दिसत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन भारतीय यष्टीरक्षकाच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला जबाबदारी देण्याचा विचार करत आहे. अक्षर पटेल लवकरच कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. मात्र अक्षराबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र दिल्ली व्यवस्थापन मेगा लिलावादरम्यान कर्णधारपदाच्या ताकदीच्या खेळाडूचा शोध घेतील असंही समोर येत आहे.
( नक्की वाचा : IND vs AUS: रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर )
दिल्ली कॅपिटल्स संघाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, "दिल्ली कॅपिटल्स नवीन कर्णधाराचा शोध घेत आहे. भारतीय अष्टपैलू अक्षर पटेल हा नवा कर्णधार होण्याची शक्यता आहे. ऋषभ पंत हा दिल्लीचा अव्वल रिटेन्शन खेळाडू असणार असला तरी, पंतने कर्णधारपदाच्या दबावाला बळी न पडता स्पर्धेत खेळावे, असे दिल्ली कॅपिटल्सच्या शीर्ष व्यवस्थापनाला वाटते."
दिल्लीने आज नवीन कोचिंग स्टाफची नियुक्ती केली आहे. माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर वेणुगोपाल राव यांची दिल्लीच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोघेही दीर्घकाळापासून संघाशी जोडले गेले आहेत. रिकी पाँटिंगचा प्रशिक्षणपदाचा कालावधी संपल्यानंतर दिल्लीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही हायप्रोफाईल खेळाडूची निवड न करण्याचा निर्णय घेतला आणि हेमांग बदानी यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.