Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्सनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक उपांत्य फेरीत केलेली अविश्वसनीय 127* रनची खेळी भारतीय क्रिकेटसाठी एक 'गेम-चेंजर' ठरली. या खेळीमुळेच भारतानं 339 रनचा विश्वविक्रमी पाठलाग यशस्वी केला आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघानं अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला विश्वचषक जिंकला. आज जेमिमा ही देशाची हिरो आहे, पण एक वर्षापूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. त्यावेळी जेमिमाला एका मोठ्या वादाचा सामना करावा लागला होता.
एका वर्षापूर्वी काय घडलं होतं?
साल 2024 मध्ये, जेमिमाच्या मुंबईतील क्लबवर म्हणजेच 'खार जिमखाना'वर एका तक्रारीनंतर तिचं सदस्यत्व रद्द करण्याची वेळ आली होती. ही तक्रार जेमिमाचे वडील, इव्हान रॉड्रिग्स, यांच्याविरोधात होती. त्यांनी क्लबच्या जागेचा वापर अनधिकृत धार्मिक सभा घेण्यासाठी वापर केला, असा त्यांच्यावर आरोप होता.
खार जिमखाना व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिव मल्होत्रा, यांच्या माहितीनुसार, इव्हान रॉड्रिग्स हे जेमिमाच्या सदस्यत्वाचा वापर करून 'प्रेसिडेंशियल हॉल' सवलतीच्या दरात बुक करत होते. हे बुकिंग कथितरित्या धार्मिक कार्यक्रमांसाठी केले जात होते, जे क्लबच्या नियमांमधील कलम 4 चे उल्लंघन होते.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: हा चमत्कार बायबलमुळे झाला! जेमिमा रॉड्रिग्सनं सांगितलं ऐतिहासिक इनिंगचं रहस्य, पाहा Video )
जेमिमा काय म्हणाली होती?
या घटनेवर जेमिमानं आता एका मुलाखतीत मौन तोडलं आहे. ती म्हणाली, "सर, खरं सांगायचं तर, मला आठवतंय जेव्हा ते सगळं झालं. मला त्याचा सामना करणं एक गोष्ट होती, पण जेव्हा माझ्या आई-वडिलांना आम्ही न केलेल्या गोष्टीसाठी ओढलं गेलं, तेव्हा मला खूप लागलं.
त्या वेळी आम्ही जे काही केलं होतं, ते सर्व नियमांनुसार आणि नियमावलीनुसार होतं, याचे आमच्याकडे पुरावे आहेत. पण माझ्या आणि माझ्या कुटुंबावर जे आरोप झाले, त्यामुळे आम्हाला खूप दुःख झालं, कारण आम्ही काहीही चुकीचं केलं नव्हतं."
'एकापाठोपाठ एक धक्के बसले'
जेमिमा पुढे म्हणाली की, "हे सर्व दुबईतील विश्वचषकानंतर लगेच घडलं होतं, जिथे आम्ही चांगली कामगिरी केली नव्हती. माझं वैयक्तिक प्रदर्शनही अपेक्षेनुसार नव्हतं आणि मी आधीच निराश होते. आणि मग अचानक, मला बातम्या, मेसेजेस दिसू लागले आणि लोक माझ्याबद्दल - आणि त्याहून वाईट म्हणजे माझ्या कुटुंबाबद्दल आणि माझ्या चर्चबद्दल भयंकर गोष्टी बोलत होते. यामुळे मी पूर्णपणे कोलमडून गेले.
मला आठवतंय, माझ्या भावानं मला फोन केला आणि मी फक्त रडू लागले. मला काय करावं हे कळत नव्हतं. आधी माझी कामगिरी, आणि मग माझ्या कुटुंबावरचे खोटे आरोप, मला एकापाठोपाठ एक धक्के बसल्यासारखं वाटलं."
( Jemimah Rodrigues : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करत टीम इंडियाला फायनलमध्ये नेणारी जेमिमा रॉड्रिग्स कोण आहे? )
जेमिमाच्या वडिलांचं स्पष्टीकरण काय?
या आरोपांनंतर, गेल्या वर्षी जेमिमाचे वडील इव्हान रॉड्रिग्स यांनीही आपली बाजू मांडली होती. त्यांनी स्पष्ट केलं होतं की, बैठका खार जिमखाना प्रक्रियेनुसारच आयोजित केल्या होत्या आणि काही माध्यमांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचा धर्मांतराशी कोणताही संबंध नव्हता.
त्यांनी सांगितलं होतं की, "माध्यमांमध्ये सध्या येत असलेल्या चुकीच्या आणि निराधार बातम्यांच्या पार्श्वभूमीवर, आम्हाला काही तथ्ये रेकॉर्डवर आणायची आहेत. आम्ही एप्रिल 2023 पासून एका वर्षाच्या कालावधीत अनेक वेळा प्रार्थना सभांसाठी खार जिमखान्याच्या सुविधांचा लाभ घेतला होता. मात्र, हे खार जिमखानामध्ये असलेल्या प्रक्रियेनुसार आणि पदाधिकाऱ्यांच्या पूर्ण माहितीनुसार केले गेले होते."
"प्रार्थना सभा सर्वांसाठी खुल्या होत्या आणि माध्यमांतील लेखांमध्ये चुकीचा उल्लेख केल्याप्रमाणे त्या कोणत्याही प्रकारे 'धर्मांतरण बैठका' नव्हत्या. जेव्हा आम्हाला प्रार्थना सभा थांबवण्यास सांगण्यात आलं, तेव्हा आम्ही जिमखान्याच्या भूमिकेचा आदर करत तात्काळ त्या थांबवल्या."