Who is Jemimah Rodrigues : डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमी, नवी मुंबई येथे झालेल्या आयसीसी महिला ODI वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये (India vs Australia) इतिहास घडला आहे. मुंबईची मुलगी जेमिमा रॉड्रिग्सने (Jemimah Rodrigues) 127 रनची अविश्वसनीय खेळी करत 339 रनच्या विशाल लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि भारतीय टीमला वर्ल्ड कप फायनलचे तिकीट मिळवून दिले. गिटार वाजवणारी आणि राष्ट्रीय हॉकीपटू असलेली ही 25 वर्षीय बॅटर, कॅप्टन हरमनप्रीत कौरसोबत शतकी पार्टनरशिप करून रातोरात टीम इंडियाची 'मास्टर ब्लास्टर' ठरली आहे.
सेमीफायनलमध्ये साकारला इतिहास
ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करताना भारतीय टीमसमोर 339 रनचे मोठे आव्हान ठेवले होते. कोणत्याही टीमसाठी हा स्कोअर खूप मोठा होता. भारतीय टीमने लवकर दोन विकेट गमावल्यानंतर, क्रिजवर आलेल्या जेमिमा रॉड्रिग्सने सामन्याचे चित्रच बदलून टाकले.
तिने केवळ 115 बॉल्समध्ये आपले तिसरे ODI शतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे तिचे पहिलेच शतक ठरले. जेमिमाने 134 बॉल्समध्ये 14 फोर आणि 3 सिक्सरच्या मदतीने 127 रनची नाबाद खेळी केली. तिची ही मॅच-विनिंग इनिंग भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी रन-चेसपैकी एक ठरली.
Jemimah Rodrigues just did to Australia what Australia usually does to everyone else.
— Sagar (@sagarcasm) October 30, 2025
Chased the impossible! pic.twitter.com/ozoKrWyTXF
जेमिमा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्यातील निर्णायक शतकी भागीदारीने विजयाचा पाया रचला. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय टीम आता 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे.
𝙏𝙚𝙖𝙧𝙨 𝙊𝙛 𝙅𝙤𝙮 💙
— BCCI Women (@BCCIWomen) October 30, 2025
Absolute scenes from Navi Mumbai 🇮🇳#TeamIndia | #WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS | @JemiRodrigues | @mandhana_smriti | @ImHarmanpreet pic.twitter.com/Mw6DahFmz2
'बेबी ऑफ द स्क्वॉड' ते टीम इंडियाचा कणा
5 सप्टेंबर 2000 रोजी मुंबईच्या वांद्रे परिसरात जन्मलेल्या जेमिमाने 2018 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी साऊथ आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यावेळी तिला टीमची सर्वात लहान सदस्य, अर्थात "बेबी ऑफ द स्क्वॉड," म्हणून ओळखले जात असे. मात्र, काळाच्या ओघात हीच 'बेबी' आता टीम इंडियाचा 'कणा' बनली आहे. 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कमबॅक करून तिने भारतीय बॅटिंगचे उज्ज्वल भविष्य दाखवून दिले.
यापूर्वी, 2017 मध्ये, 19 वर्षांखालील स्थानिक वन-डे ट्रॉफीमध्ये तिने सौराष्ट्रविरुद्ध 202 रनची नाबाद खेळी केली होती. स्मृती मानधनानंतर (Smriti Mandhana) 19 वर्षांखालील देशांतर्गत स्पर्धेत डबल-सेंच्युरी करणारी ती दुसरी भारतीय महिला बॅटर ठरली.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: ऐतिहासिक सेंच्युरीनंतर धाय मोकलून का रडू लागली जेमिमा? विजयानंतर केलं मोठं वक्तव्य, VIDEO )
राष्ट्रीय हॉकीपटू
क्रिकेटमध्ये पूर्णवेळ करिअर निवडण्यापूर्वी जेमिमा नॅशनल-लेव्हलची हॉकी प्लेयर होती. तसेच, ती बास्केटबॉल आणि फुटबॉलमध्येही शालेय स्तरावर खेळली आहे. तिने महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील फील्ड हॉकी टीमसाठीही प्रतिनिधित्व केले आहे. 2012-13 सीझनमध्ये मुंबईच्या 19 वर्षांखालील क्रिकेट टीमसाठी तिने पदार्पण केले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या महिला टीमकडून खेळणाऱ्या जेमिमाला 2018 मध्ये बीसीसीआयने (BCCI) 'बेस्ट डोमेस्टिक ज्युनियर वुमन्स क्रिकेटर'चा 'जगमोहन दालमिया अवॉर्ड' (Jagmohan Dalmiya Award) प्रदान केला.
आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या पहिल्या WPL ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) तिला 2.2 कोटी रुपये (Rs 2.2 crore) मध्ये आपल्या टीममध्ये घेतले.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: हा चमत्कार बायबलमुळे झाला! ऑस्ट्रेलियाला लोळवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सनं सांगितलं ऐतिहासिक इनिंगचं रहस्य, पाहा VIDEO )
चर्च आणि संगीताशी जोडलेली नाळ
जेमिमा एका कॅथोलिक कुटुंबातून येते. तिचे वडील इव्हान रॉड्रिग्स (Ivan Rodrigues) हे मुंबईतील एका स्कूल क्रिकेट टीमचे कोच आहेत आणि त्यांनीच जेमिमाला सुरुवातीचे क्रिकेटचे ट्रेनिंग दिले. तिची आई लोरी रॉड्रिग्स (Lorry Rodrigues) म्युझिक टीचर आहेत आणि जेमिमा स्वतः एक उत्कृष्ट गिटार प्लेयर आणि सिंगर आहे. मॅचनंतर तिला अनेकदा टीममेट्ससोबत गाताना किंवा गिटार वाजवताना दिसते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world