टीम इंडियाचे महान खेळाडू कपिल देव सध्या दु:खी आहेत. त्यांचा जवळचा मित्र आणि टीम इंडियातील सहकाऱ्याचं आजारपण त्यांच्या या अवस्थेचं कारण आहे. टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि कोच अंशुमन गायकवाड सध्या गंभीर आजारी आहेत. गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झालाय. त्यांच्यावर लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जवळच्या मित्राला हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळलेलं पाहून कपिल देव हेलावले आहेत. त्यांनी BCCI ला याबाबत विनंती केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'हे अतिशय वाईट आणि डिप्रेसिंग आहे. मी अंशुमनबरोबर खेळलोय. मला याचा खूप त्रास होतोय. मी त्याला या परिस्थितीमध्ये पाहू शकत नाही. बोर्ड त्याची काळजी घेईल, याची मला काळजी आहे. आम्ही कुणालाही बळजबरी करायची नाही. अंशूसाठी शक्य असेल ती सर्व मदत करावी. त्यानं देशासाठी खेळताना चेहऱ्यावर तसंच छातीवर अनेक बॉल झेलले आहेत. आता त्याच्यासोबत उभं राहण्याची वेळ आलीय,' अशी भावना कपिल यांनी 'स्पोर्ट्स स्टार'शी व्यक्त केलीय.
माजी खेळाडूंना अडचणीत मदत मिळेल अशी कोणतीही यंत्रणा भारतामध्ये नाही, अशी खंत कपिल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ' दुर्दैवानं आपल्याकडं कोणती सिस्टम नाही. सध्याच्या खेळाडूंना चांगले पैसे मिळताय ते पाहून चांगलं वाटतं. आमच्यावेळी बोर्डाकडं पैसा नव्हता. आज आहे. सीनियर खेळाडूंना मदत करण्याची गरज आहे.'
( नक्की वाचा : 6,6,4,6 युवराज सिंहचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध रौद्र रुप, जुन्या आठवणी झाल्या ताज्या, Video )
कपिल पुढं म्हणाले की, 'आम्ही आमची मदत कुठं पाठवणार? एखादा ट्रस्त असता तर आम्ही पैसे पाठवू शकलो असतो. पण, कोणती सिस्टम नाही. असा ट्रस्ट हवा असं मला वाटतं. हे काम बीसीसीआय करु शकतं. हा ट्रस्ट विद्यमान आणि माजी खेळाडूंची काळजी घेईल. कुटुंबानं परवानगी दिली तर आम्ही आमच्या पेन्शनची रक्कम दान करण्यासाठी तयार आहोत.'
मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदनलाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद हे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी निधी जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही कपिल यांनी सांगितलं.
अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात 40 टेस्ट आणि 15 वन-डेमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या कालखंडात टीम इंडियाचे हेड कोच होते.