बीसीसीआयच्या (BCCI) निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमा याला संघातून मुक्त केले आहे. विशेष म्हणजे, 9.20 कोटी रुपयांची मोठी बोली लावूनही मुस्तफिजूरला कोणतीही आर्थिक नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता धुसर आहे, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खेळाडूंच्या हक्कांवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या निर्णयामागे खेळाडूची कामगिरी किंवा दुखापत नसून, बीसीसीआयने दिलेले विशेष निर्देश असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणात मुस्तफिजूरचा कोणताही दोष नसतानाही त्याला आर्थिक फटका बसणार आहे.
नुकसानभरपाई का मिळणार नाही?
मुस्तफिजूरला लिलावात 9.20 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत त्याला एक रुपयाही मिळण्याची चिन्हे नाहीत. आयपीएलमध्ये खेळाडूंच्या पगाराचा विमा असतो. पण तो प्रामुख्याने दुखापतीशी संबंधित असतो. मुस्तफिजूरला दुखापतीमुळे नाही, तर प्रशासकीय कारणास्तव बाहेर काढले आहे.
केकेआर कायदेशीररित्या त्याला पैसे देण्यास बांधील नाही. मुस्तफिजूरकडे भारतीय न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे, परंतु आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी ही प्रक्रिया अत्यंत जटील आहे. बीसीसीआयने या निर्णयाचे स्पष्ट कारण दिलेले नाही, केवळ "नजीकच्या घडामोडींमुळे हे आवश्यक होते" असे म्हटले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आक्रमक पवित्रा
बीसीसीआयच्या या निर्णयावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. भारताने मुस्तफिजूरवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ, बांगलादेशने त्यांचे टी-20 वर्ल्ड कपमधील सामने भारतातून श्रीलंकेत* हलवण्याची मागणी केली आहे. सूत्रानुसार, भारत आणि बांगलादेशमधील सध्याचे अस्थिर राजकीय वातावरण या वादाला कारणीभूत ठरत आहे.