जाहिरात
This Article is From Aug 19, 2024

नीरजकडून कसलं वचन घेतलं? अखेर मनू भाकरच्या आईने स्पष्टच सांगितलं.. 

आता पहिल्यांदा मनू भाकरच्या आईने त्या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

नीरजकडून कसलं वचन घेतलं? अखेर मनू भाकरच्या आईने स्पष्टच सांगितलं.. 
नवी दिल्ली:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्य तर मनू भाकरने दोन कांस्य पदक जिंकले आहेत. त्यांचं देशभरातून कौतुक होत असताना आणखी एका कारणाने दोघेही चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांचे दोन व्हिडिओ समोर आले होते, त्या व्हिडिओमध्ये मनू आणि नीरज हळूवार आवाजात एकमेकांशी बोलताना दिसत होते. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मनू भाकरच्या आईने नीरजचा हात डोक्यावर ठेवून त्याच्याकडून वचनही घेतलं होतं. या व्हिडिओवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अनेकांनी तर आम्हाला जोडी पसंत असल्याचंही म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी मनू भाकरच्या वडिलांनी दोघांमध्ये असं काही नसल्याचं सांगितलं होतं. 

आता पहिल्यांदा मनू भाकरच्या आईने त्या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मनुची आई पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान नीरजसोबत बोलताना दिसत होती. ज्याप्रकारे मनू भाकरची आई सुमेधा भाकरशी संवाद साधला होता. यावेळी दोघांमध्ये मनूवरुन बोलणं झाल्याची चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर यावर स्पष्टीकरण आलं आहे. 

पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मनूच्या आईने नीरजबद्दल म्हटलं की, मी मनू भाकरसाठी खूश आहे. मी सर्व खेळाडूंसाठी खूश आहे. मी पॅरिसला गेले तेव्हा हॉकी टीम, अमन सेहरावत, नीरज चोप्राला भेटले. मी त्यांच्यासाठी खूप खूश आहे. येत्या काळातही सर्व खेळाडूंनी भरपूर पदकं जिंकत राहावी आणि देशातील सर्व आईंचा आनंद वाढवावा. मनुच्या आई सुमेधा पुढे म्हणाल्या, मला नीरजला भेटून आनंद झाला. तो माझ्या मुलाप्रमाणे आहे. माझ्या मुलीसह सर्वांनी अजून पदक घेऊन यावीत आणि देशाचा सन्मान वाढवावा. 

मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धा आणि दहा मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी प्रकारात सरबजोत सिंहसोबत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. ती ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली, त्याशिवाय तिने ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 12 वर्षांनंतर पहिल्यांदा पदकं मिळवली. 22 वर्षांची मनु ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू ठरली. दुसरीकडे नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक, त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं.