MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेट विश्वातील 'ऑल टाईम ग्रेट' म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्त होऊन आता चार वर्ष उलटली आहेत. त्यानंतरही त्याचं फॅन फॉलोइंग कमी झालेलं नाही. चेन्नई सुपर किंग्सची टीम (Chennai Super Kings) जिथं खेळत असते तिथं धोनीचे फॅन्स त्याला बघण्यासाठी गर्दी करतात. सीएसकेच्या प्रत्येक मॅचला मैदानात पिवळा सागर दिसत असतो. धोनीची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स वाट्टेल ते करत असतात. याच परंपरेतील एक उदाहरण समोर आलं आहे.
धोनीला पाहण्यासाठी या फॅननं तब्बल 64 हजार रुपये मोजले आहेत. इतकंच नाही तर आयपीएल मॅचचं तिकीट मिळवण्यासाठी मुलींच्या शाळेची फी देखील अद्याप भरली नसल्याचं या फॅननं सांगितलं. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेपॉक मैदानावर झालेला सामना पाहण्यासाठी हा फॅन त्याच्या मुलींसोबत गेला होता. आपल्याला या मॅचची तिकीट सुरुवातीला मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही 64 हजार रुपये मोजून ब्लॅकमध्ये तिकीट खरेदी केले.
'मला तिकीटं मिळाली नाहीत. त्यामुळे मी ती ब्लॅक खरेदी केले. त्यासाठी तब्बल 64 हजार रुपये मोजले. मी अजून शाळेची फीस भरली नाही. पण, आम्हा महेंद्रसिंह धोनीला फक्त एकदा पाहायचं होतं. मी आणि माझ्या तिन्ही मुली खूप आनंदी आहोत,' असं या फॅननं 'स्पोर्ट्स वॉक चेन्नई' शी बोलताना सांगितल्याचं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे. ही तिकीटं मिळवण्यासाठी माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले. धोनी खेळायला आला तेव्हा आम्ही खूप खूश झालो होतो, अशी भावना धोनीची फॅन असलेल्या एका मुलीनं व्यक्त केली.
धोनीची मॅच पाहण्यासाठी मोठी किंमत मोजलेल्या या फॅन्सना चेन्नई सुपर किंग्सनं विजयी भेट दिली. सीएसकेनं या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सनं पराभव केला. श्रेयस अय्यरच्या टीमचा आयपीएल 2024 मधील हा पहिलाच पराभव आहे.
नव्या रेकॉर्डनंतर 'ती' गोष्ट आठवून ऋतुराज भावुक, धोनीबद्दल म्हणाला...
सीएसकेकडून रविंद्र जडेजानं 18 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या अचूक गोलंदाजीनं केकेआरला 9 आऊट 137 रन्सपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 67 रनच्या जोरावर चेन्नईनं हा सामना 14 बॉल राखून जिंकला. महेंद्रसिंह धोनी या सामन्यात पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. त्यानं फक्त तीन बॉल खेळले आणि एक रन काढला. चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना रविवारी (14 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.