Mumbai Cricket Association (MCA) President Election : जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष ठरला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. अजिंक्य नाईक यांना एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार गटाचा पाठिंबा होता. त्यांनी संजय नाईक यांचा 107 मतांनी पराभव केला आहे.
MCA अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना 221 तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय नाईक यांना 114 मतं मिळाली. या निवडणुकीत एकूण 335 जणांनी मतदान केलं होतं. नाईक विरुद्ध नाईक झालेल्या या थेट लढतीमध्ये अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. संजय नाईक यांना भाजपा नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचा पाठिंबा होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
का झाली MCA अध्यक्षपदाची निवडणूक ?
अजिंक्य नाईक हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे जावाई असून MCA चे विद्यमान सचिव होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे यापूर्वीचे अध्यक्ष अमोल काळे यांचं T20 वर्ल्ड कप मधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झालं होतं. त्यासाठी ही निवडणूक झाली.
अमोल काळे यांची ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदी निवड झाली होती. भारतीय क्रिकेटची मुंबई पंढरी मानली जाते. त्यामुळे या असोसिएशनच्या अध्यक्षपदाला मोठं महत्त्व आहे. अमोल काळे यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा या निवडणुकीत 25 मतांनी पराभव केला होता.
( नक्की वाचा : Joe Root vs Sachin Tendulkar : जो रुट खरंच सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार? काय आहे समीकरण )
जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनवर यापूर्वीही राजकारण्यांचं वर्चस्व राहिलं आहे. शरद पवार यांच्यासह दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील MCA चं अध्यक्षपद भूषवलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यंदा MCA अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण, पटोले यांनी काँग्रेस नेते भूषण पाटील यांना पाठिंबा देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. भूषण पाटील यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्यानं निवडणुकीत अजिंक्यय नाईक आणि संजय नाईक हे दोन उमेदवार होते.