Neeraj Chopra record: भारताचा स्टार भालाफेकपटू, दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये इतिहास रचला आहे. नीरजने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 90 मीटर पेक्षा जास्त भाला फेकला आहे. तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकत त्याने इतिहास रचला आहे. नीरजचा नवा राष्ट्रीय विक्रम आहे.
नीरजने दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला होता, पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वांना चकित करून इतिहास रचला. भालाफेक खेळाच्या इतिहासात 90 मीटरहून अधिक भाला फेकणारा तो पहिला भारतीय आहे. 90 मीटर पेक्षा जास्त अंतर कापणारा तो आजवरचा 25 वा आणि पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.
मात्र इतिहास घडवूनही, नीरजने स्पर्धा दुसऱ्या स्थानासह पूर्ण केली. जर्मनीचा ज्युलियन वेबर स्पर्धेत बाजी मारत अव्वल स्थान गाठलं. वेबरने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात 91.06 मीटर भाला फेकला. गेल्या वर्षीही नीरज दोहा डायमंड लीगमध्ये फक्त एका सेंटीमीटरच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर राहिला होता.
टोकियोमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक, बुडापेस्टमध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि डायमंड लीगमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतरही एक प्रश्न होता की नीरज 90 मीटर अंतर कधी पार करेल. त्याचं उत्तर नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये दिलं आहे. या कामगिरीनंतर नीरजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.