T20 World Cup 2026: पाकिस्तानचा भारताविरुद्ध खेळण्यास नकार; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट केली भूमिका

T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या या 'निवडक सहभागावर' आयसीसीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक स्पर्धांमध्ये सर्व संघांनी वेळापत्रकानुसार खेळणे बंधनकारक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, पाकिस्तान क्रिकेट संघ आगामी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. श्रीलंकेत 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यावर पाकिस्तानने अधिकृतपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. "आम्ही भारताविरुद्ध न खेळण्याची भूमिका अत्यंत विचारपूर्वक आणि सखोल चर्चेनंतर घेतली आहे," असे शरीफ यांनी इस्लामाबादमधील कॅबिनेट बैठकीत सांगितले.

काय आहे नेमकं प्रकरण?

या वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा आयसीसीने (ICC) बांगलादेश ऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत स्थान दिले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतात सुरक्षिततेचे कारण देत खेळण्यास नकार दिला होता आणि त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावत स्कॉटलंडला संधी दिली. पाकिस्तानने बांगलादेशच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवत भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विधान

पाकिस्तानी पंतप्रधानांनी  बोलताना सांगितले की, "खेळात राजकारण नसावे. आम्ही ही भूमिका बांगलादेशच्या समर्थनार्थ आणि आयसीसीच्या पक्षपाती धोरणाविरोधात घेतली आहे. आमचा संघ विश्वचषकातील इतर सामने खेळण्यासाठी श्रीलंकेला जाईल, परंतु 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध मैदानात उतरणार नाही."

आयसीसीचा इशारा आणि संभाव्य परिणाम

पाकिस्तानच्या या 'निवडक सहभागावर' आयसीसीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक स्पर्धांमध्ये सर्व संघांनी वेळापत्रकानुसार खेळणे बंधनकारक आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेटच्या मूळ भावनेला तडा जात आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये आर्थिक दंड आणि निलंबनाचा समावेश असू शकतो.

Advertisement

भारताला मिळणार 'वॉकओव्हर'?

आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखादा संघ ठरलेल्या वेळी मैदानावर टॉससाठी उपस्थित राहिला नाही, तर प्रतिस्पर्धी संघाला विजयी घोषित केले जाते. जर पाकिस्तानने बहिष्कार कायम ठेवला, तर टीम इंडियाला न खेळताच 2 गुण मिळतील. तसेच, पाकिस्तानच्या 'नेट रन रेट'वरही याचा मोठा परिणाम होईल, ज्यामुळे त्यांना पुढच्या फेरीत जाणे कठीण होऊ शकते.

पाकिस्तानचा संघ सध्या सलमान अली आगा याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत पोहोचला असून 7 फेब्रुवारीला त्यांचा पहिला सामना नेदरलँड विरुद्ध होणार आहे. आता पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहतो की आयसीसीच्या दबावाखाली माघार घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article