Paris Olympic : भारतीय हॉकी संघाचं 'सुवर्ण स्वप्न' भंगलं, उपांत्य फेरीत जर्मनीची बाजी

भारतीय बचावफळीचा सुरेख खेळ परंतु मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीय खेळाडू अपयशी

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून वंचित रहावं लागलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीवर ५-४ ने मात करत कांस्य पदक मिळवत पदकांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या कामगिरीत कमालीचं सातत्य दाखवत पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केला. परंतु यावेळी जर्मनीने सरस खेळ करत ३-२ च्या फरकाने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश करत भारताच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं आहे.

साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात केल्यानंतर भारतीय संघाने उपांत्य सामन्यात जर्मनीविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सत्रात सातव्या मिनीटाला भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताचं खातं उघडलं. यानंतर पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत भारताचं सामन्यावर वर्चस्व पहायला मिळालं.

दुसऱ्या सत्रात १-० ची आघाडी असलेला भारतीय संघ पिछाडीवर पडलेला पहायला मिळाला. जर्मनीने आपल्या आक्रमणाची धार वाढवत भारतीय बचावफळीवर हल्ले चढवायला सुरुवात केली. याचा फायदा जर्मनीला झाला. १८ व्या मिनीटाला गोंझालो पिलीआटने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करत जर्मनीला १-१ अशी बरोबरी साधून दिली. जर्मनीच्या या आक्रमणामुळे भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला. बचावफळीतील खेळाडूंकडून यादरम्यान वारंवार चुका होताना दिसत होत्या. ज्यामुळे मध्यांतराला ३ मिनीटं बाकी असताना २७ व्या मिनीटाला जर्मनीला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. ज्याचा पुरेपूर फायदा घेत ख्रिस्तोफर रुरने गोल करत जर्मनीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या फेरीत भारतीय संघ नव्या दम्याने मैदानावर उतरला. भारताच्या आघाडीच्या फळीने जर्मनीवर प्रतिहल्ला करत पेनल्टी कॉर्नरवर गोल करायची संधी मिळवली. परंतु जर्मनीच्या गोलकिपरने भारताचे सर्व हल्ले परतवून लावले. जर्मन बचावफळी भेदण्यात भारताला वारंवार अपयश येत होतं. अखेरीस ३६ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅगफ्लिकवर सुखजीत सिंगने बॉलला हलकेच गोलपोस्टची दिशा दाखवत भारताला सामन्यात २-२ अशी बरोबरी साधून दिली.

Advertisement

अवश्य वाचा - Paris Olympic मध्ये विनेश फोगाटची धाकड कामगिरी, 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत

चौथ्या सत्रात जर्मन खेळाडूंनी पुन्हा भारतावर दडपण आणायला सुरुवात केली. चौथ्या सत्रात जर्मनीला दोन पेनल्टी कॉर्नरही मिळाले. परंतु हे दोन्ही प्रयत्न भारताने सुरेख बचाव करत हाणून पाडले. परंतु बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवण्यात भारतीय खेळाडूंना यादरम्यान अपयश आलं. जर्मनीने दोन संधी गमावल्यानंतरही बॉलचा ताबा आपल्याकडे राहिल याची काळजी घेत हल्ले सुरु ठेवले. अखेरीस भारतीय बचावफळी भेदण्यात जर्मनीला यश आलं. ५४ व्या मिनीटाला मार्को मिल्टकूने मैदानी गोल करत मोक्याच्या क्षणी जर्मनीला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. 

सामना संपायला शेवटची तीन मिनीटं बाकी असतानाही भारतीय खेळाडूंना बॉलवर ताबा ठेवण्यात यश येत नव्हतं. गोल करण्याची संधी मिळावी यासाठी भारताने अखेरच्या मिनीटांमध्ये गोलकिपर श्रीजेशला बाहेर बोलावत आक्रमणाची धार अधिक धारदार करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही चाल भारताचा चांगलीच महागात पडली. श्रीजेशने मैदान सोडल्यानंतर लगेचच जर्मनीने एका पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. परंतु भारतीय बचावफळीने जर्मनीचा हा हल्ला परतवून लावला.

Advertisement

शेवटच्या एका मिनीटात भारताला सामन्यात बरोबरी साधण्याच्या दोन संधी चालून आल्या होत्या. परंतु भारतीय खेळाडू या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरले आणि जर्मनीने ३-२ च्या फरकाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी जर्मनीची लढत नेदरँडविरुद्ध तर भारतीय संघ कांस्य पदकासाठी स्पेनविरुद्ध सामना खेळणार आहे.