Paris Olympic मध्ये विनेश फोगाटची धाकड कामगिरी, 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत

उपांत्य फेरीच्या सामन्यात विनेश फोगाटने क्युबाच्या कुस्तीपटूचा ५-० ने धुव्वा उडवत थाटात अंतिम फेरी गाठली

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पॅरिस ऑलिम्पिक येथे भारताचं आणखी एक पदक निश्चीत झालं. भारताची युवा महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे. ज्यामुळे भारताला या प्रकारात आता किमान एक रौप्यपदकाची आशा बाळगता येणार आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात विनेशसमोर क्युबाच्या लोपेझ गुझमनचं आव्हान होतं. उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे सर्व देशवासियांच्या नजरा या विनेशकडे होत्या. कोणतीही जोखीम न घेत विनेशने लोपेझचा अंदाज घेत सावध खेळ करायला सुरुवात केली.

दुसरीकडे लोपेझच्या खेळातही पहिल्या फेरीमध्ये फारशी आक्रमकता दिसत नव्हती. ज्यामुळे रेफ्रींनी लोपेझला पॅसिव्ह खेळ केल्याबद्दल (संथ खेळ केल्याप्रकरणी) वॉर्निंग दिली. यानंतर पुढील ३० सेकंदांमध्ये लोपेझला एखादं आक्रमण करुन गुण मिळवणं अनिवार्य होतं. परंतु यामध्ये ती अपयशी ठरल्यामुळे पहिल्या फेरीच्या शेवटी विनेशला १ गुण बहाल करण्यात आला.

दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या लोपेझने विनेशच्या पायावर आक्रमण करायला सुरुवात केली. परंतु विनेशने उत्तम बचाव करत लोपेझचं आक्रमण हाणून पाडलं. यानंतर सामन्याची गती पुन्हा एकदा थंडावली. परंतु यावेळी रेफ्रीनी संथ खेळ केल्याप्रकरणी विनेश फोगाटला वॉर्निंग दिली. 

Advertisement

परंतु विनेशने यादरम्यान कसलीही चूक न करता लोपेझच्या पायांवर पकड बसवत दोन गुणांची कमाई केली. यानंतर विनेशने मागे वळून पाहिलंच नाही. लोपेझवर आपली पकड आणखी घट्ट करत विनेशने आणखी दोन गुणांची कमाई करत अंतिम फेरीसाठी आपल्याकरता दार खुलं केलं. सरतेशेवटी ५-० च्या फरकाने विनेश फोगाटने हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.

ऑलिम्पिक खेळांमध्ये कुस्तीत अंतिम फेरी गाठणारी विनेश पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नव्हती.

पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवेपर्यंतचा विनेश फोगाटचा प्रवास सोपा नव्हता. काही महिन्यांपूर्वी भारतात कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातील आंदोलनात विनेशने बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह सक्रीय सहभाग घेतला होता. या लढ्यात विनेशला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. अनेकांनी यादरम्यान विनेशवर राजकीय आरोप करत तिला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान विनेश फोगाटवर एक शस्त्रक्रीयाही झाली होती.

Advertisement

परंतु या सर्व अडचणींवर मात करत विनेशने गरजेच्या वेळी स्वतःचा वजनी गट बदलत आपल्याला कुस्तीसाठी सज्ज केलं. जागतिक स्पर्धांमध्ये विनेशने ऑलिम्पिकचा कोटा मिळवत पॅरिससाठी आपलं तिकीट निश्चीत केलं. या सर्व मेहनत आणि संघर्षाचा परिपाक पॅरिसमध्ये दिसून येत असल्याची भावना सध्या भारतीय चाहते बोलून दाखवत आहेत.