Prakash Padukone and Shriram Finance Join Forces: भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी आणि विशेषतः बॅडमिंटन प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतातील आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी श्रीराम फायनान्स लिमिटेड (SFL) आणि पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन (PSB) यांच्यात एक मोठा करार झाला आहे. या भागीदारीमुळे भारतातील 18 शहरांमधील तळागाळातील क्रीडा गुणवत्तेला मोठे बळ मिळणार असून बॅडमिंटन प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
बेंगळुरू येथील पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्समध्ये या भागीदारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या विशेष कार्यक्रमाला श्रीराम फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर आणि भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण उपस्थित होते.
या करारानुसार, भारतातील पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनची सर्व 75 केंद्रे आता श्रीराम फायनान्स प्रेझेंट्स पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन या ब्रँड नावाने ओळखली जाणार आहेत. या सहकार्याचा मुख्य उद्देश सर्व वयोगटातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.
( नक्की वाचा : Rishabh Pant: 27 कोटींचा डाव फसला! ऋषभ पंतने कॅप्टनसी का सोडली? जाणून घ्या यामागचं खरं कारण )
क्रीडा पायाभूत सुविधांना मिळणार मोठी ताकद
या बहुवर्षीय भागीदारी अंतर्गत अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये नामकरण अधिकारासोबतच खेळाडूंच्या किट आणि पोशाखाचीही जबाबदारी घेण्यात आली आहे. अकॅडमीमधील तरुण खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांना 2,000 पेक्षा जास्त सह-ब्रँडेड टी-शर्ट्स दिले जाणार आहेत. तसेच, श्रीराम फायनान्स 13 खुल्या स्पर्धांसाठी मुख्य प्रायोजक असेल आणि 2 मोठ्या यॉनेक्स ऑल इंडिया स्पर्धांनाही सहकार्य करणार आहे.
तळागाळातील खेळाडूंना मिळणार हक्काचं व्यासपीठ
प्रकाश पदुकोण यांनी स्थापन केलेली ही संस्था नवशिक्यांपासून प्रगत खेळाडूंपर्यंत सर्वांसाठी एक प्रमाणित कोचिंग चौकट प्रदान करते. त्यांनी आतापर्यंत 1,300 हून अधिक प्रशिक्षकांना प्रमाणित केले आहे. या भागीदारीबद्दल बोलताना प्रकाश पदुकोण यांनी आनंद व्यक्त केला.
तळागाळातील गुणवत्तेचा विकास करण्याबाबत आमचा आणि श्रीराम फायनान्सचा दृष्टिकोन समान असल्याचे त्यांनी सांगितले. या पाठिंब्यामुळे तरुण खेळाडूंना उच्च दर्जाचे कोचिंग, सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी अतिरिक्त संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तरुणांना प्रोत्साहित करण्याचा मानस
या उपक्रमाबाबत बोलताना उमेश रेवणकर यांनी सांगितले की, श्रीराम फायनान्सने नेहमीच स्थानिक समुदायावर सकारात्मक प्रभाव पाडण्यावर भर दिला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतातील तरुणांना खेळाप्रती वचनबद्ध आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी प्रोत्साहित करू शकू. भारतीय खेळाच्या भविष्यासाठी तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधांना पाठिंबा देऊन त्या अधिक सक्षम करणे हा आमचा उद्देश आहे.
गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून श्रीराम फायनान्स सामान्य जनता आणि उपक्षित घटकांना सेवा देत आहे. सध्या या कंपनीचे व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 3.02 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त आहे. केवळ आर्थिक व्यवहार न करता समुदायाच्या विकासासाठी काम करण्याच्या संस्कृतीला अनुसरूनच ही क्रीडा भागीदारी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world