R Ashwin Retirement: टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने आपल्या 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम दिला. अश्विनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
अश्विनची सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "खास दिवस आणि म्हणूनच एक खास सुरुवात. ते म्हणतात की प्रत्येक समाप्तीची एक नवीन सुरुवात होते. आयपीएलमधील क्रिकेटपटू म्हणून माझी वेळ आज संपत आहे, पण आता वेगवेगळ्या लीगमध्ये खेळाचा माझा प्रवास आजपासून सुरू होत आहे. मला इतकी वर्षे चांगल्या आठवणी आणि संबंध दिल्याबद्दल सर्व फ्रँचायझींचे आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला आतापर्यंत जे काही दिले, त्याबद्दल आयपीएल आणि बीसीसीआयचेही आभार. मी भविष्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी उत्सुक आहे."
(नक्की वाचा : Sanju Samson : संजू सॅमसनसोबत धोका, टीममध्ये निवड पण Playing 11 मध्ये जागा नाही ! कारणही उघड )
अश्विनची आयपीएलमधील यशस्वी कारकीर्द
38 वर्षीय अश्विनने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) आयपीएलमध्ये पदार्पण केले. शेवटचा सामनाही त्याने 2025 मध्ये याच संघासाठी खेळला, जिथे तो 9.75 कोटी रुपयांमध्ये परतला होता. 220 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 187 विकेट्स घेतल्या, ज्यात 30.22 ची सरासरी आणि 4-34 ही सर्वोत्तम कामगिरी होती. फलंदाजीमध्ये त्याने 833 धावा केल्या, ज्यात एक अर्धशतक (50) आणि 13.02 ची सरासरी आहे.
चेन्नई सुपर किंग्ससोबत 2010 आणि 2011 मध्ये विजेतेपद जिंकण्यात अश्विनचा मोठा वाटा होता. याव्यतिरिक्त, त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले.