भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह याचे वडील खानचंद्र सिंह यांचे आज निधन झाले. ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खानचंद्र सिंह हे गेल्या काही काळापासून स्टेज-4 लिव्हर कॅन्सरने (यकृताचा कर्करोग) ग्रस्त होते. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
वडिलांसाठी रिंकूने सोडली होती टीम इंडियाची साथ
टी-20 विश्वचषक 2026 ची स्पर्धा सुरू असतानाच रिंकूला वडिलांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळाली होती. वडिलांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची बातमी मिळताच रिंकू चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरील सराव सत्र सोडून तातडीने आपल्या घरी रवाना झाला होता. इतर खेळाडू सरावात व्यस्त असताना रिंकूच्या अनुपस्थितीने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, त्यानंतर त्याच्या वडिलांच्या आजारपणाचे वृत्त समोर आले होते.
(नक्की वाचा- IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर! सेमीफायनल गाठण्यासाठीचे 2 पर्याय)
प्रशिक्षकांनी दिली होती माहिती
नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी रिंकूच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले होते. "रिंकूच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने तो घरी गेला आहे आणि तो लवकरच संघात परतेल अशी आम्हाला आशा आहे," असे कोटक यांनी म्हटले होते. मात्र, आता वडिलांच्या निधनामुळे रिंकूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आगामी सामन्यांबाबत अनिश्चितता
रिंकू सिंह हा भारतीय टी-20 संघाचा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, या घरगुती संकटामुळे तो विश्वचषकातील आगामी सामन्यांमध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्याप BCCI ने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्याच्या कठीण काळात संपूर्ण क्रिकेट जगत आणि चाहते रिंकूच्या पाठीशी उभे आहेत.