देशाला ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं पण... तुरुंगात पोहचला! हिरो ते झिरोपर्यंत पूर्ण केला प्रवास

सध्या सर्व जगाचं लक्ष पॅरीसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेकडं (Paris Olympics 2024) लागलं आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत मेडल जिंकावं ही जगभरातील खेळाडूंची इच्छा असते.

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

सध्या सर्व जगाचं लक्ष पॅरीसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेकडं (Paris Olympics 2024) लागलं आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत मेडल जिंकावं ही जगभरातील खेळाडूंची इच्छा असते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडू अक्षरश: सर्वस्व पणाला लावत असतात. या स्पर्धेत मेडल मिळवणं म्हणजे आयुष्याचं सार्थक होणं अशी त्यांची भावना असते. ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूला संपूर्ण देशात खेळाडूंना कायम आदराची वागणूक मिळते.

ऑलिम्पिक स्पर्धेत एक नाही तर दोन मेडल जिंकणारा भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारही (Sushil Kumar) त्याला अपवाद नव्हता. कुस्तीची आपल्या देशाला मोठी परंपरा आहे. या परंपरेतील 'ऑल टाईम ग्रेट' खेळाडू म्हणून सुशीलकडं पाहिलं जात होतं. ऑलिम्पकसह जगभरातील वेगवेगळ्या स्पर्धा त्यानं जिंकल्या. ऑलिम्पिकमध्ये तर दोन मेडल मिळवली. या कामगिरीमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी, मान-सन्मान मिळाले. तो लाखो खेळाडूंचा आदर्श होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा  )
 

पण... सुशील कुमारच्या आयुष्यानं एक वेगळचं वळण घेतलं. त्याच्याच कर्मानं त्याची सर्व मेहनत अक्षरश: पाण्यात गेली. ऑलिम्पिक मेडल, सर्व विजेतेपद हे सर्व धुळीस मिळालं. सुशील कुमार थेट जेलमध्ये पोहोचला. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिकच्या निमित्तानं देशाच्या या हिरोचा झिरोपर्यंतचा प्रवास कसा झाला हे पाहूया...

ड्रायव्हरचा मुलगा ते सुपरस्टार

सुशील कुमारचा जन्म 26 मे 1983 रोजी झाला. त्याचे वडील MTNL मध्ये ड्रायव्हर तर आई गृहिणी होती. सुशील वडिलांचं कुस्तीपटू होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुशील कुस्तीपटू बनला. वयाच्या 14 व्या वर्षी दिल्लीतील कुस्तीचं केंद्र असलेल्या छत्रसाल स्टेडियममध्ये सुशीलनं ट्रेनिंगला सुरुवात केली. याच स्टेडियमचं तो पुढे भूषण बनला... आणि इथंच झालेल्या एका प्रसंगानं त्याची सारी कमाई वाया गेली.

2004 साली झालेल्या ऑलिम्पकमध्ये सुशीलला कमाल करता आली नाही. या निराशाजनक सुरुवातीनंतर त्यानं लगेच कमबॅक केलं. 2005 आणि 2007 साली झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेत त्यानं विजेतेपद पटकावलं. 2008 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकनं सुशीलचं सारं आयुष्य बदललं.

Advertisement

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील सुरुवातीला पराभूत झाला. त्यानंतर रेपचार्ज राऊंडमध्ये त्यानं कमाल करत थेट ब्रॉन्झ मेडल जिंकलं. खाशाबा जाधव (1952 ऑलिम्पिक)  यांच्यानंतर तब्बल 46 वर्षांनी भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक मेडल मिळालं. सुशीलनं 46 वर्षांची अपयशी मालिका मोडली. दिल्लीतल्या ड्रायव्हरचा मुलगा देशाचा सुपरस्टार बनला.

भारतीय कुस्तीमधील 'ऑल टाईम ग्रेट'

बीजिंग ऑलिम्पिकनंतरची पुढची चार वर्ष सुशील कुमारसाठी भरभराटीची होती. 2010 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं गोल्ड मेडल मेडल पटकावलं. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय होता. त्याचवर्षी दिल्लीमध्ये झालेल्या कॉमवेल्थ गेममध्येही सुशीलनं गोल्ड मेडल जिंकलं.

Advertisement

लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुशील गोल्ड मेडलचा दावेदार होता. त्यानं सिल्व्हर मेडल मिळवलं. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वैयक्तिक पदक जिंकणारा सुशील कुमार हा पहिला भारतीय ठरला. त्यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूलाही कामगिरी करता आलेली नव्हती. सुशीलच्या कारकिर्दीमधील हा सर्वोच्च पॉईंट होता.

( Arshad Nadeem : पाकिस्तान ते पॅरिस! भाला खरेदीसाठी पैसे नसलेल्या अर्शदनं गोल्ड मेडल कसं जिंकलं? )

नरसिंह यादवशी वाद 

लंडन ऑलिम्पिकनंतर सुशील कुमारच्या कारकिर्दीला उतरण सुरु झाली. 2016 साली रिओमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याची सुशीलची इच्छा होती. सुशीलच्या 76 किलो फ्री स्टाईल गटात नरसिंह यादव हा नवा पैलवान दावेदार होता. सुशीलकडं गौरवशाली इतिहास होता. तर नरसिंहकडं उज्जवल भविष्य. सुशीलच्या पोतडीत अनेक विजेतेपद होती. तर नरसिंह मैदानात तळपत होता. त्याचा फॉर्म पाहता नरसिंहची सुशीलऐवजी रिओमध्ये निवड झाली.

Advertisement

सुशील कुमारनं नरसिंहच्या निवडीला आव्हान दिलं. हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. दिल्ली उच्च न्यायालयानं सुशीलची  याचिका फेटाळली. पण हे प्रकरण इथंच थांबलं नाही. नरसिंह यादव ऑलिम्पिक पदार्पण करण्याच्या एक दिवस आगोदर डोपिंग चाचणीत दोषी आढळला. त्याच्यावर जागतिक डोंपिंवरविरोधी संघटनेनं चार वर्षांची बंदी घातली.

आपल्याला डोपिंगमध्ये अडकवण्यात आलं असा आरोप नरसिंहनं केला. नरसिंह सुशीलचा दबदबा असलेल्या दिल्लीत छत्रसाल स्टेडियममध्ये ट्रेनिंग करत असे. तेथील कनिष्ठ मल्लांनी खाण्यात काही तरी मिसळल्याचा नरसिंहनं आरोप केला. संशयाची सुई सुशील कुमारवर होती. प्रस्थापित विरुद्ध नवोदीत या वादात देशाची जागतिक पातळीवर नाचक्की झाली.

( नक्की वाचा : Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं पटकावलं सिल्व्हर मेडल! पाकिस्तानला गोल्ड )

कसा पोहोचला जेलमध्ये?

सुशील कुमारचं आयुष्य 4 मे 2021 या दिवशी पूर्ण बदललं. माजी ज्युनिअल नॅशनल चॅम्पियन सागर धनकरची या दिवशी हत्या झाली.  छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या वादातून त्याची हत्या झाली. या हत्या प्रकरणात सुशील कुमार मुख्य आरोपी होता. व्हायरल व्हिडिओमध्ये सुशीलनं सागरला मारहाण केली त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं दिसत होतं.

दिल्ली पोलिसांनी सुशीलच्या नावानं वॉरंट काढलं. ज्या सुशील कुमारनं जगभरात देशाची मान उंचावली तो तोंड लपवून काही काळ फरार होता. त्याचा लपंडाव फार चालला नाही. पोलिसांनी सुशीलला अटक केली. सुशीलला सराईत आरोपीप्रमाणे तोंड झाकून कोर्टात हजर करण्यात आलं. त्याची तिहार जेलमध्ये रवानगी झाली. 

सुशीलच्या संपूर्ण कारकिर्दीला मोठा डाग लागला. माज आणि चुकीची संगत यामुळे भारताच्या सर्वात मोठ्या क्रीडापटूवर ही वेळ आली. यश मिळवणं, सर्वोच्च शिखरावर पोहचणं अवघड आहे. त्यापेक्षा ते टिकवणं आणखी अवघड आहे. सुशील कुमारला हे यश टिकवता आलं नाही. त्यामुळेच कारकिर्दीच्या शिखरावरुन त्याची वेगानं घसरण झाली.  हिरो ते झिरो हा कुणाच्याही वाटेला येऊ नये असा प्रवास आपल्या देशातील सर्वोच्च मल्लानं पूर्ण केला आहे.