Massive Update On Rohit Sharma And Virat Kohli ODI Future: टीम इंडियाचे दोन महान बॅटर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटलाही रामराम ठोकला आहे. यामुळे ते आता वन-डे क्रिकेट तरी खेळणार का? हा फॅन्सना प्रश्न पडलाय.
रोहित-विराट वन-डे क्रिकेट खेळणार की लवकरच या फॉरमॅटलाही अलविदा करणार? हा प्रश्न फॅन्सला सतावतोय. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या अफवा येत असतात. त्यामुळे त्यांचा हा गोंधळ आणखी वाढलाय. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तसंच त्यांनी इतर दोन फॉरमॅटमधून निवृत्ती का घेतली? हे देखील त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : ENG vs IND : 'आयसीसीने याकडे लक्ष देण्याची गरज', लॉर्ड्स टेस्टमधील अंपायरवर अश्विन संतापला )
बीसीसीआय उपाध्यक्षांनी स्पष्ट केले, 'मी हे एकदाच आणि सर्वांसाठी स्पष्ट करू इच्छितो. आम्हा सर्वांना रोहित आणि विराटची उणीव भासते, पण रोहित आणि विराटने निवृत्तीचा निर्णय स्वतः घेतला आहे. बीसीसीआयचे हे धोरण आहे की आम्ही कधीही कोणत्याही खेळाडूला कधी आणि कोणत्या फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी हे सांगत नाही.
खेळाडू कधी निवृत्ती घेतो हे त्याच्यावर अवलंबून असते. या दोघांचा हा स्वतःचा निर्णय होता. त्यांनी स्वतः निवृत्ती घेतली आहे. आम्हांला त्यांची उणीव नेहमीच भासत राहील. आम्ही त्यांना महान बॅटर मानतो. आमच्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की ते एकदिवसीय क्रिकेटसाठी उपलब्ध आहेत, ' असं शुक्ला यांनी स्पष्ट केलं.
कधी घेतली होती निवृत्ती?
रेड बॉल क्रिकेटमध्ये खराब फॉर्मात असलेल्या रोहित शर्मानं इंग्लंड सीरिजपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांमध्येच विराट कोहलीनंही टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. हे दोघंही ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटची टेस्ट सीरिज खेळले. त्यामध्ये टीम इंडियाचा 1-3 नं पराभव झाला होता. त्या दौऱ्यात त्यांना मोठा स्कोअर करण्यात सातत्यानं अपयश आलं. त्यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती.