Sanju Samson : टीम इंडियाचा विकेट किपर आणि आक्रमक बॅटर संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या T20 सीरिजमध्ये संजूनं दोन सेंच्युरी झळकावल्या होत्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच कॅलेंडर वर्षात तीन सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय बनला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सीरिजमध्ये संजू- अभिषेक शर्मासह भारतीय इनिंगची ओपनिंग करेल.
19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. भारतीय टीममधील विकेटकिपरच्या जागेसाठी संजूची ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेलसोबत स्पर्धा आहे. सध्या फॉर्मात असलेल्या संजूची वन-डे क्रिकेटमधील सरासरी 56.66 इतकी आहे. T20 मधील फॉर्म आणि वन-डेमधील रेकॉर्ड या जोरावर संजूची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड निश्चित मानली जात होती. पण, तो या स्पर्धेपूर्वीच अडचणीत आलाय. संजूच्याच एका निर्णयामुळे त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विमान चुकण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजूची होणार चौकशी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावस्तर ट्रॉफीमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभानंतर बीसीसीआयनं खेळाडूंसाठी 10 पॉईंट्सची दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळणे हा महत्त्वाचा नियम आहे. खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावंच लागेल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी या नियमाचं पालन केलं नव्हतं. त्याचा त्यांना फटका बसला आहे. त्यांना टीम इंडियातील स्थान गमवावं लागलं होतं.
संजू सॅमसननं देखील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाची बीसीसीआय चौकशी करणार असल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलं आहे. संजूला ही चूक महाग पडू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात येणाऱ्या टीममध्ये त्याचा समावेश न होण्याची शक्यता असल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Team India : 6 महिने मिळत नव्हती कुठं संधी, आता 664 ची सरासरी! टीम इंडियात होणार निवड? )
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीची टीम निवडण्यासाठी निवड समितीची बैठक होऊ शकते. या बैठकीपूर्वी निवड समिती संजूची चर्चा करेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, ' देशांतर्गत क्रिकेटबाबत निवड समिती आणि बोर्डाची भूमिका स्पष्ट आहे. गेल्या वर्षी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी कोणतीही परवानगी न घेता देशांतर्गत क्रिकेट खेळले नव्हते. त्यामुळे त्यांना बीसीआयचं कॉन्ट्रॅक्ट गमवावं लागलं होतं.
संजू सॅमसननंही विजय हजारे स्पर्धा न खेळण्याचं कारण बीसीसआय आणि निवड समितीला सांगितलेलं नाही. संजू त्याचा जास्तीत जास्त वेळ दुबईमध्येच घालवतो, अशी आत्तापर्यंतची माहिती आहे.