जाहिरात

Team India : 6 महिने मिळत नव्हती कुठं संधी, आता 664 ची सरासरी! टीम इंडियात होणार निवड?

Karun Nair Record : नायरनं या स्पर्धेत आत्तापर्यंतच्या 6 सामन्यात  112*, 44*, 163*, 111*, 112*आणि 122* रन केले आहेत.

Team India : 6 महिने मिळत नव्हती कुठं संधी, आता 664 ची सरासरी! टीम इंडियात होणार निवड?
मुंबई:


'प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे' भारतीय बॅटर करुण नायरनं डिसेंबर 2022 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (जुने नाव ट्विटर) केली होती. त्यावेळी करुण खराब फॉर्ममध्ये होता. पण, नंतरच्या वर्षभरात त्यानं पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. त्यानं दमदार खेळामुळे पुन्हा एकदा टीम इंडियातील जागेवर दावा केला आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रि्पल सेंच्युरी झळकावणाऱ्या दोन भारतीयांमध्ये करुणचा समावेश होता. या त्रिशतकी खेळानंतर त्याला नंतर क्रिकेटमधील सर्वात मोठ्या प्रकारातून वगळण्यात आलं. पण, सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत करुण जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी त्याच्या नावाचा विचार करणे निवड समितीला भाग आहे. 

नायरचे रेकॉर्ड्स

देशांतर्गत क्रिकेटमधील 50 ओव्हर्सच्या सामन्यांची महत्त्वाची स्पर्धा म्हणून विजय हजारे ट्रॉफीची ओळख आहे. नायरनं या स्पर्धेत आत्तापर्यंतच्या 6 सामन्यात  112*, 44*, 163*, 111*, 112*आणि 122* रन केले आहेत. तो या स्पर्धेत अद्याप एकदाही आऊट झालेला नाही. त्यानं तब्बल 664 रन एकदाही आऊट न होता केले आहेत. 

लिस्ट A क्रिकेटमध्ये एकदाही आऊट न होता सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड नायरनं केला आहे. विजय हजारे स्पर्धेतील एकाच सिझनमध्ये पाच सेंच्युरी करणारा तो दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी तामिळनाडूच्या नारायण जगदीशननं ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर लिस्ट A क्रिकेटमध्ये सलग चार सेंच्युरी करणाऱ्या तीन बॅटर्सपैकी तो एक आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

6 महिने मिळत नव्हती टीम!

करुण नायर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पण, त्याचा हा प्रवास सहज झालेला नाही. 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा संघर्ष सांगितला आहे. '6 महिने मी कोणतंही क्रिकेट खेळत नव्हतं. मी फक्त नेटमध्ये सराव करण्यासाठी रोज तीन तास प्रवास करत असे. माझ्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कोणत्याही प्रकारासाठी माझा विचार होत नव्हता. त्या काळात मी खूप भावनिक झालो होतो.

मी यामधून बाहेर पडलो आणि माझ्यावर काम केलं. अर्थात पुढं जाणं इतकं सोपं नव्हतं. मला यामधून बाहेर पडण्यासाठी काही महिने लागली. मी स्वत:ला तयार करत होतो. मला एक संधीची गरज होती. ती संधी मिळाली तर ड्रॉप करण्याचं कोणतंही कारण मला द्यायचं नव्हतं.  त्यासाठी मला सातत्य राखणे आवश्यक होते. त्यामुळे मी खेळावर कठोर परिश्रम घेतले,' असं नायरनं सांगितलं. 

(नक्की वाचा : IND vs ENG : वर्ल्ड कप गाजवणारा हिरो टीम इंडियात परतला ! अक्षर पटेलवर मोठी जबाबदारी )
 

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज क्रिकेटपटू सध्या त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. त्यांच्या जागेवर टेस्ट टीममध्ये खेळण्यासाठी करुण नायरचा विचार होण्याची शक्यता आहे. 

'देशाकडून खेळण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मी देखील त्याला अपवाद नाही. मला पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेट खेळायचं आहे. त्यासाठी मला माझे काम पुन्हा-पुन्हा करावे लागेल, ' अशी प्रतिक्रिया टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रि्पल सेंच्युरी करणाऱ्या नायरनं दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com