पाकिस्तानचा विकेट किपर -बॅटर मोहम्मद रिझवाननं (Mohammad Rizwan) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतेच 3000 रन पूर्ण केले आहेत. हा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्याचं सध्या अनेक जण अभिनंदन करतायत. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन शहा आफ्रिदीनं (Shaheen Shah Afridi) देखील सोशल मीडियावर रिझवानचं अभिनंदन केलं. आफ्रिदीला हे अभिनंदन करणे चांगलंच महागात पडलंय. कारण, क्रिकेट फॅन्स त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.
रिझवानची केली ब्रॅडमनशी तुलना
शाहीन आफ्रिदीनं X वर पोस्ट करताना म्हंटलं की, 'टी20 क्रिकेटचा ब्रॅडमन आणि पाकिस्तान क्रिकेटचा सुपरमॅन मोहम्मद रिझवानचं अभिनंदन. तुझ्या प्रभावामुळे खेळ बदललाय. त्याचबरोबर शंकेखोरांची बोलती बंद केलीय. अशीच उंच भरारी घेत जा चॅम्पियन. तू अनेकांचं प्रेरणास्थान आहेस.'
शाहीन आफ्रिदीनं ही पोस्ट करताच त्याला फॅन्सनी ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. ही उपहासात्मक पोस्ट आहे का? असा प्रश्न एका युझरनं विचारला. तर आणखी एका युझरनं 'T20 क्रिकेटच्या ब्रॅडमननं' 3000 रन करण्याकरता किती बॉल घेतले याची माहिती पोस्ट केलीय.
( नक्की वाचा : यशस्वी जयस्वालला वर्ल्ड कपसाठी गिल नाही तर 'या' खेळाडूचं आव्हान )
रिझवाननं 93 मॅचमधील 80 इनिंगमध्ये 49.16 च्या सरासरीनं 3048 रन केले आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 26 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. रिझवानचा स्ट्राईक रेट हा 127.42 इतका साधारण आहे. त्याच्यावर अनेकदा संथ स्ट्राईक रेटनं खेळण्याबद्दल टीका झालीय.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या 5 टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. यामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा पाकिस्ताननं जिंकला. तर न्यूझीलंडनं तिसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधलीय. न्यूझीलंडचे सर्व प्रमुख खेळाडू आयपीएल खेळत असल्यानं पाकिस्तान दौऱ्यावर दुसऱ्या फळीतील खेळाडू आले आहेत. तर, पाकिस्तानची टीम मात्र त्यांच्या अव्वल खेळाडूंसह या मालिकेत उतरली आहे.