वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी लवकरच टीम इंडियाची निवड होणार आहे. 2013 नंतर भारतानं एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. गेल्या 11 वर्षातील दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी 15 जणांवर निवड समितीला शिक्कामोर्तब करायचं आहे. वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल 2024 मध्ये सर्व प्रमुख भारतीय खेळाडू खेळतायत. त्यामुळे निवड समितीचं आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीकडं बारिक लक्ष आहे.
यशस्वीला चॅलेंज
आयपीएलपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक रन्स केले होते. यशस्वीच्या धावांचा हा ओघ आयपीएलमध्ये काहीसा आटलाय. यशस्वीनं 7 मॅचमध्ये फक्त 17.28 च्या सरासरीनं 121 रन केले आहेत. पहिल्या 7 मॅचमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. त्यानं 30 पेक्षा जास्त रन फक्त 1 वेळा केले असून 39 हा त्याचा सर्वोच्च आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये पहिला ओपनर कॅप्टन रोहित शर्मा असेल हे फिक्स आहे. रोहित शर्माचा जोडीदार म्हणून शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात स्पर्धा असल्याचं मानलं जात होतं. हे दोन्ही खेळाडू तरुण आहेत. त्याचबरोबर त्यांनी गेल्या काही सीरिजमध्ये स्वत: ला सिद्ध केलंय. त्यामुळे भविष्याचा विचार करुन गिल आणि यशस्वी दोघांचीही अंतिम 15 मध्ये निवड होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
शुभमन गिलची आयपीएलमधील कामगिरी समाधानकारक आहे. त्यामुळे त्याची निवड फिक्स मानली जातेय. त्याचवेळी रिझर्व्ह ओपनर म्हणून यशस्वी जैस्वालला या आयपीएल सिझनमध्ये तडाखेबंद खेळी करणाऱ्या एका तरुण भारतीय खेळाडूनं चॅलेंज दिलंय.
( नक्की वाचा : एका मोठा खेळाडू होणार आऊट! पाहा कशी असेल वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया )
यशस्वीला कुणाचं चॅलेंज?
शुभमन गिलची निवड नक्की असताना यशस्वी जैस्वालला आता अभिषेक शर्माचं चॅलेंज निर्माण झालंय. या सिझनमध्ये सनरायझर्सनं आक्रमक बॅटिंगचा नवा ट्रेंड सेट केलाय. त्यांनी 7 पैकी 3 सामन्यात 250 पेक्षा जास्त रन केले आहेत. या मोठ्या स्कोअरमध्ये सनरायझर्सच्या ओपनर्सचा मोठा वाटा आहे. त्यांना धडाकेबाज सुरुवात करुन देण्याचं काम अभिषेक करतोय.
अभिषेकनं 7 सामन्यात 215. 96 च्या स्ट्राईक रेटनं 257 रन केले आहेत. अभिषेक देखील यशस्वीप्रमाणेच डावखुरा आहे. त्याचबरोबर त्याची स्पिन बॉलिंग देखील टीममसाठी उपयुक्त आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली हे एकसारख्या गतीनं बॅटिंग करणारे खेळाडू आहेत. त्यावेळी धडाकेबाज सुरुवात करुन देणारा X फॅक्टर म्हणून अभिषेक निर्णायक ठरु शकतो. त्याचबरोबर त्याचं डावखुरं असणंही त्याच्या निवडीत उजवं ठरु शकतं.
यशस्वीला आयपीएलचा अर्धा सिझन साधारण गेलाय. अभिषेक शर्मासोबतच्या शर्यतीमध्ये आघाडीवर राहण्यासाठी त्याला लवकरच मोठी इनिंग खेळावी लागेल. अन्यथा निवड समितीकडं अभिषेक शर्मा हा तगडा पर्याय उपलब्ध आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world