Shahid Afridi's Shocking Reveal: पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने 2011 च्या वर्ल्ड कपमधील आजवर कधीही उघड न झालेला किस्सा सांगितला आहे. त्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू थरथर कापत होते, अशी मोठी कबुली आफ्रिदीनं दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे मैदान असो किंवा मैदानाबाहेरची चर्चा, चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. सध्या टीम इंडियाने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून जेतेपद मिळवल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एका जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे.
2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये मोहाली येथे झालेल्या सेमीफायनल सामन्याचा उल्लेख करताना आफ्रिदीने एक खळबळजनक खुलासा केला. त्याने सांगितले की, त्या सामन्यात भारतीय चाहत्यांनी आपल्या संघाला दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानी खेळाडू इतके दबावाखाली आले होते की त्यांची अक्षरशः गाळण उडाली होती.
( नक्की वाचा : T20 WC 2026: BCCI चा खजिना उघडला! 131 कोटींच्या बक्षीसाची अशी होणार विभागणी; कुणाला किती मिळणार? वाचा सविस्तर )
काय म्हणाला आफ्रिदी?
एका पाकिस्तानी चॅनेलवरील चर्चेदरम्यान आफ्रिदीने सांगितले की, 2011 च्या त्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खूप चांगली झाली होती. मोहम्मद हाफीज आणि कामरान अकमल यांनी मिळून 90 रनची भागीदारी केली होती आणि त्यावेळी एकही विकेट पडली नव्हती. कर्णधार म्हणून आफ्रिदी स्वतः खूप रिलॅक्स होता आणि त्याला खात्री होती की हा सामना पाकिस्तानच जिंकणार.
मात्र, पहिली विकेट पडल्यानंतर अचानक चित्र बदलले. मोहालीच्या मैदानावरील गर्दीने भारतीय टीमला ज्या पद्धतीने प्रोत्साहन दिले, त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू दबावाखाली आले. आफ्रिदीच्या मते, मैदानातील तो प्रचंड आवाज आणि भारतीय चाहत्यांचा उत्साह पाहून त्याचे काही बॅटर मैदानावर थरथर कापत होते.
( नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )
मैदानावरील प्रचंड आवाज आणि वाढलेला दबाव
आफ्रिदीने पुढे सांगितले की, तो स्वतः डगआऊटमध्ये बसून हे सर्व पाहत होता. हाफीज आऊट झाल्यानंतर मैदानातील वातावरणात मोठा बदल झाला. प्रत्येक बॉलवर प्रेक्षकांचा आवाज इतका वाढत होता की पाकिस्तानी खेळाडूंना संघर्ष करणे कठीण झाले.
भारतीय चाहत्यांच्या त्या आवाजासमोर पाकिस्तानी खेळाडू प्रचंड मानसिक दबावाखाली गेले आणि तिथूनच सामन्याची पकड त्यांच्या हातातून सुटली. हा अनुभव शेअर करताना आफ्रिदीने मान्य केले की, घरच्या मैदानावर खेळताना प्रेक्षकांचा पाठिंबा किती मोठी भूमिका बजावतो.
भारतीय क्रिकेट संरचनेचे कौतुक
केवळ आफ्रिदीच नाही तर पाकिस्तानचे इतरही अनेक दिग्गज खेळाडू सध्या टीम इंडियाच्या कामगिरीवर फिदा झाले आहेत. भारताने नुकत्याच जिंकलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या जेतेपदानंतर जावेद मियांदादने भारतीय क्रिकेटच्या सिस्टिमचे तोंडभरून कौतुक केले.
मियांदाद म्हणाला की, भारतीय संघ आज जे यश मिळवत आहे, ते त्यांच्या मजबूत क्रिकेट आराखड्यामुळेच शक्य झाले आहे. भारताकडे सध्या टॅलेंटची कोणतीही कमतरता नाही. त्यांच्याकडे बॅटर, स्पिनर आणि फास्ट बॉलरची मोठी फळी तयार आहे. भारतीय युवा खेळाडूंमध्ये मॅच जिंकण्याची मानसिकता आणि खेळाची उत्तम समज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विजेतेपदाची सवय आणि ड्रेसिंग रूममधील वातावरण
जावेद मियांदाद यांनी पुढे सांगितले की, जेव्हा एखाद्या टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये जिंकण्याची संस्कृती निर्माण होते, तेव्हा त्या टीमला चॅम्पियन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताने गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि आता पुन्हा वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे, यामागे हेच कारण आहे.
मियांदादने दावा केला की, एकेकाळी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्येही असेच वातावरण होते, ज्यामुळे त्यांनी अनेक जेतेपदे जिंकली होती. मात्र, सध्या भारतीय संघ ज्या प्रकारे सातत्य राखत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्याने म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world