India vs Pakistan, Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा सामना रविवारी ( 14 सप्टेंबर) होत आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांच्या क्रिकेटच्या टीम पहिल्यांदाच आमने-सामने येत आहेत. भारतीय टीमनं हा सामना खेळू नये, अशी मागणी सोशल मीडियावर सातत्यानं होत आहे. त्यानंतरही बीसीसीआयनं हा सामना खेळण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही देशांमधील क्रिकेट सामना जवळ आलेला असतानाच पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, शाहिद आफ्रिदीने आगामी आशिया कप 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
काय म्हणाला आफ्रिदी?
आफ्रिदीने 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स' (WCL) स्पर्धेतील वाद पुन्हा एकदा उकरून काढला आहे. या स्पर्धेत भारताने दोन वेळा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली होती. रविवारच्या भारत-पाक सामन्यापूर्वी, आफ्रिदीने त्याचा 'सडके अंडे' (rotten egg) हा जुनाच उल्लेख पुन्हा वापरला आहे. त्याचा हा टोला भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनसाठी होता, कारण त्याने दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.
( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )
'समा टीव्ही' ला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी म्हणाला, "मी नेहमीच म्हणतो की क्रिकेट सुरू राहिला पाहिजे; त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत होते. इंग्लंडमध्ये लोकांनी WCL सामन्याची तिकिटे घेतली होती आणि खेळाडूंनी सरावही केला होता. पण मग तुम्ही खेळला नाहीत. यामागचा विचार काय होता, हे माझ्या लक्षात येत नाहीये."
आफ्रिदीने असाही दावा केला की, ज्या खेळाडूला त्याने 'सडके अंडे' म्हटले होते, त्याला त्याच्या कॅप्टनने (युवराज सिंग) सोशल मीडियावर काहीही पोस्ट न करण्याचा सल्ला दिला होता, पण त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्यास परवानगी दिली जाईल, असेही सांगितले होते.
"अगर मै नाम लुंगा ना इस वक्त, तो वो बेचारे फंस जायेंगे ( मी आता नाव घेतले, तर ते बिचारे अडचणीत येतील)," असे आफ्रिदी म्हणाला. "ज्या खेळाडूला मी 'सडके अंडे' म्हटले, त्याला त्याच्या कॅप्टनने सांगितले की, 'तुला खेळायचे नसेल, तर खेळू नकोस. फक्त सोशल मीडियावर काहीही ट्विट करू नकोस.' पण त्या खेळाडूचा हेतू काही वेगळाच होता. म्हणूनच तो 'सडके अंडे' होता," असे त्याने पुढे सांगितले.
याच मुलाखतीत, आफ्रिदीने भारतीय संघातील आणखी एका माजी खेळाडूला लक्ष्य केलं आहे. काही खेळाडू "अजूनही आपण भारतीय आहोत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत." असं तो म्हणाला.