
Shahid Afridi : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 चा पहिला सेमीफायनल सामना आज (31 जुलै) इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार होता. मात्र, पाकिस्तानविरुद्ध भारतीय खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे.
त्यानंतर काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी, ड्रेसिंग रूमच्या छतावरून भारतीय खेळाडूंकडे निराशपणे पाहताना दिसत आहे.
का दिला नकार?
खरं तर, पाकिस्तानविरुद्ध भारतीय खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिल्यानंतर WCL ने नियमानुसार पाकिस्तान चॅम्पियन्स संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. यासोबतच इंडिया चॅम्पियन्स संघाचा स्पर्धेतील प्रवास संपला आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू स्टेडियममधून बाहेर पडत असताना, शाहिद आफ्रिदीला स्टेडियमच्या छतावरून भारतीय खेळाडूंना बाहेर जाताना पाहिले गेले. यावेळी तो खूप हताश दिसत होता.
Indian team packing their bags and knocked out out of WCL 🇮🇳
— TEAM AFRIDI (@TEAM_AFRIDI) July 30, 2025
Lala watching them from the balcony. #WCL2025 pic.twitter.com/zpmffXfqWE
नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. यामध्ये शेजारील पाकिस्तानकडून सहकार्य मिळण्याऐवजी भारताला लक्ष्य करण्यात आले होते. ही पाकिस्तानची जुनी सवय अआहे.
हीच बाब देशवासियांना खुपत आहे. याचा परिणाम खेळांवरही होत आहे. शिखर धवन, इरफान पठाण, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांसारख्या अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानसोबत खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
( नक्की वाचा : WCL : टीम इंडियाचा ऐतिहासिक निर्णय, पाकिस्तानविरुद्ध सेमी फायनल खेळण्यास दिला नकार! )
याच कारणामुळे गट फेरीनंतर सेमीफायनलचा सामनाही रद्द करण्यात आला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सने 'एक्स'वर एका पोस्टद्वारे म्हटले आहे की ते चाहत्यांच्या भावनांचा आदर करतात.
WCL च्या वतीने सांगण्यात आले आहे, "WCL मध्ये आम्ही नेहमीच जगामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी खेळाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला आहे. तथापि, जनतेच्या भावनांचा नेहमी आदर केला पाहिजे - शेवटी, आम्ही जे काही करतो ते आमच्या प्रेक्षकांसाठी आहे."
WCL ने पुढे लिहिले आहे, "आम्ही इंडिया चॅम्पियन्सच्या सेमीफायनलमधून माघार घेण्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि पाकिस्तान चॅम्पियन्सच्या स्पर्धेत उतरण्याच्या तयारीचाही तितकाच आदर करतो. सर्व गोष्टींचा विचार करता इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. परिणामी, पाकिस्तान चॅम्पियन्स आता फायनलमध्ये आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world