Asia Cup 2025 : भारतीय क्रिकेट विश्वाला आता आशिया कपचे वेध लागले आहेत. 9 सप्टेंबरपासून ही स्पर्धा यूएईमध्ये सुरु होत आहे. आशिया कपमध्ये यंदा T20 सामने खेळले जाणार आहेत. भारत या प्रकारातील वर्ल्ड चॅम्पियन आहे. तसंच टीम इंडिया आशिया कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. आशिया कपचे अधिकृत प्रसारण भागीदार असलेल्या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनं एक प्रोमो प्रसिद्ध केलाय. हा प्रोमो सध्या चांगलाच वादात अडकलाय.
या प्रोमोमध्ये टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव, पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी आणि दिग्गज बॅटर वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी हवा निर्माण करणे हा या जाहिरातीचा उद्देश होता. पण,या प्रोमोमुळे सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे. तसंच क्रिकेट फॅन्सनी जोरदार नाराजी व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये 23 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यास पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दहशतवादी जबाबदार होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं त्यांच्या दहशतवाद्यांच्या बाजूनं उतर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ही सर्व जखम क्रिकेट फॅन्सच्या मनात ताजी आहे. त्यामुळेच अनेक फॅन्स आणि तज्ज्ञांनी आशिया कपवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे, आता क्रिकेट फॅन्सनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे, तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा प्रचार केल्याबद्दल BCCI आणि सेहवाग यांच्यावरही टीका केली आहे.
या स्पर्धेपूर्वी, सेहवागने भारताच्या आशिया कप जिंकण्याच्या संधीबद्दल आशा व्यक्त केली आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सेहवाग म्हणाला, "आम्ही विश्वविजेते आहोत. आम्ही नुकताच विश्वचषक, T20 विश्वचषक जिंकला आहे, आणि मला खात्री आहे की आशिया कपमध्ये आम्ही सर्वोत्कृष्ट संघ आहोत आणि आम्ही आशिया कप नक्कीच जिंकू."
तो पुढे म्हणाला, "मला वाटते की आमचा संघ खूप चांगला आहे आणि स्काय (सूर्यकुमार) जबाबदारीनं नेतृत्व करत आहे, तो T20 फॉरमॅटमधील एक अव्वल खेळाडू आहे. मला खात्री आहे की त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगली कामगिरी करू, कारण भूतकाळात स्कायने नेतृत्व स्वीकारले, तेव्हा आम्ही अनेक T20 सामने जिंकले आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही आशिया कप देखील जिंकू."
( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )
आशिया कपमध्ये भारत ग्रुप A मध्ये UAE, पाकिस्तान आणि ओमान सोबत आहे. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबर रोजी UAE विरुद्ध करेल. 14 सप्टेंबर रोजी भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल आणि ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना 19 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमान विरुद्ध होईल.
आशिया कपसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह.