Shikhar Dhawan Wedding : भारतीय क्रिकेट टीमचा माजी धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. ४० वर्षीय शिखरने शनिवारी २१ फेब्रुवारी २०२६ आपली प्रेयसी सोफी शाइन हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
दिल्लीमध्ये एका खाजगी समारंभात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला शिखरचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. शिखरचा जुना सहकारी युजवेंद्र चहलने या लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत. शिखर आणि सोफी गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. २०२५ मध्ये दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ते पहिल्यांदा एकत्र दिसले. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी साखरपुड्याची घोषणा केली होती.
कोण आहे सोफी शाइन?
सोफी ही मूळची आयर्लंडची आहे. तिने मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली असून सध्या ती अबू धाबीमधील 'नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन'मध्ये सेकंड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे. त्यासोबतच ती 'शिखर धवन फाउंडेशन'चे कामही पाहते.
लग्नासाठी खास लूक...
लग्नासाठी शिखरने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी परिधान केली होती. सोफीने आयव्हरी रंगाचा सुंदर लेहंगा घातला होता. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी त्यांचे कपडे डिझाइन केले होते. शिखर धवनचे पहिले लग्न २०१२ मध्ये आयेशा मुखर्जीशी झाले होते, परंतु २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगा आहे. शिखरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत "Mr. & Mrs. Dhawan" असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांकडून आणि क्रिकेट विश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world