Shreyas Iyer Appointed India's New T20I Captain: गेल्या काही दिवसांपासून सुत्रांच्या आधारावर दिल्या जात असलेल्या बातमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) शिक्कामोर्तब केलं आहे.श्रेयस अय्यर आता भारतीय टी20 टीमचा नवा कॅप्टन असेल. निवड समितीच्या या मोठ्या निर्णयामुळे टीम इंडियातील सूर्यकुमार यादवच्या युगाचा एकप्रकारे अंत झाला आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीमनं मोठी यश शिखरं सर केली, पण गेल्या जवळजवळ 2 वर्षांपासून बॅटिंगमधील त्याचा सुमार फॉर्म आणि 2028 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचं प्लॅनिंग यामुळे त्याला खुर्ची गमवावी लागली आहे. आता श्रेयसच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची एक नवी युवा ब्रिगेड मैदानावर उतरताना दिसेल. अर्थात, श्रेयससाठी हा मुकुट मिळवणं सोपं नव्हतं, अनेक दिग्गज या रेसमध्ये होते. पण अखेर 4 मोठ्या कारणांमुळे श्रेयसनं इतर सगळ्या स्पर्धकांना मागे टाकत बाजी मारली आहे.
1. व्हाईट बॉल क्रिकेटसाठी एकच कॅप्टन
बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून वनडे आणि टी20 म्हणजेच व्हाईट बॉल क्रिकेटसाठी एकाच कॅप्टनच्या शोधात होती. रोहित शर्मानं 2024 चा टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर बोर्डानं सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्याकडे जबाबदारी देऊन पाहिली. पण सूर्यकुमार वनडेत फिट बसत नव्हता, तर गिलला टी20 मध्ये स्वतःला सिद्ध करता आलं नाही.
संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्मा यांचेही पर्याय समोर होते. तिलक वर्मा हा भविष्यात तिन्ही फॉर्मॅट खेळणारा प्लेयर असला, तरी कॅप्टन म्हणून त्याच्याकडे दांडगा अनुभव नाही. याच गोष्टीचा फायदा श्रेयसला झाला आणि तो बोर्डाच्या प्लॅनिंगमध्ये अगदी योग्य बसला.
( नक्की वाचा : एका फोन कॉलने लग्न लांबवलं आणि रचला इतिहास! कोण आहे हा खेळाडू ज्याने RCB ला पहिल्यांदा चॅम्पियन बनवलं )
2. कॅप्टनशीपचा जबरदस्त आणि मोठा अनुभव
श्रेयस अय्यरला कॅप्टन बनवण्यामागचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा टी20 क्रिकेटमधील कॅप्टनशीपचा अनुभव आणि त्याचा रेकॉर्ड. श्रेयसकडे आयपीएलमध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त मॅचमध्ये कॅप्टनशीप करण्याचा अनुभव आहे. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सध्याचा हेड कोच गौतम गंभीर यांच्यानंतर आयपीएलमध्ये 100 मॅचमध्ये कॅप्टनशीप करणारा श्रेयस हा केवळ पाचवा कॅप्टन आहे.
श्रेयसनं दिल्ली कॅपिटल्ससाठी 41 मॅच, केकेआरसाठी 30 मॅच आणि पंजाब किंग्ससाठी 20 मॅचमध्ये कॅप्टनशीप केली आहे. आयपीएलच्या एकूण 100 मॅचमध्ये श्रेयसनं कॅप्टनशीप करताना आपल्या टीमला 54 मॅच जिंकवून दिल्या आहेत, तर 44 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि 2 मॅचचा निकाल लागला नाही.
देशांतर्गत टी20 मॅचेसचा विचार केला, तर श्रेयसनं आतापर्यंत 127 मॅचमध्ये कॅप्टनशीप केली असून त्यातील 74 मॅचमध्ये विजय आणि 52 मॅचमध्ये पराभव पाहावा लागला आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआरनं 2024 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती आणि पुढच्याच वर्षी पंजाबची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. हाच अनुभव त्याच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरला.
( नक्की वाचा : 6, 6, 6, 6, 6, 6, 6... वैभव सूर्यवंशीनं मोडला ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड, मिळालं नवं नाव! )
3. कॅप्टन म्हणून बॅटिंगमध्ये तुफानी परफॉर्मन्स
श्रेयसनं केवळ त्याच्या कॅप्टनशीपच्या जोरावर टीमला फायनल आणि विजेतेपद मिळवून दिलं नाही, तर त्यानं स्वतः समोरून नेतृत्व करत बॅटनं देखील धावांचा पाऊस पाडला. आपणच टीम इंडियाच्या कॅप्टन पदासाठी सर्वात योग्य दावेदार आहोत, हे त्यानं आपल्या परफॉर्मन्सनं दाखवून दिलं.
गेल्या वर्षी श्रेयसनं पंजाबसाठी खेळताना 17 मॅचमध्ये 50.33 च्या सरासरीनं 6 हाफ सेंच्युरी ठोकत 604 रन केले होते. तर काही दिवसांपूर्वीच संपलेल्या यंदाच्या सीझनमध्ये त्यानं 14 मॅचच्या 13 इनिंग्जमध्ये 55.33 च्या सरासरीनं 1 सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरी झळकावत 498 रन केल्या. यावरून त्याचा सध्याचा फॉर्म किती खतरनाक आहे हे स्पष्ट होते.
4. गंभीरचा शब्द का मानला नाही?
नवा कॅप्टन निवडण्यापूर्वी निवड समितीानं हेड कोच गौतम गंभीरसोबत सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान गंभीरनं नव्या कॅप्टनसाठी संजू सॅमसनच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, निवड समितीनं गंभीरकडे दुसरं नाव मागितलं, तेव्हा भारतीय हेड कोचनं श्रेयस अय्यरचं नाव सुचवलं. दुसरीकडे, बीसीसीआयची सर्वोच्च समिती देखील श्रेयसलाच नवा कॅप्टन बनवण्याच्या बाजूनं होती. त्यामुळे निवड समितीला श्रेयसच्या नावावर शिक्कामोर्तब करणं अगदी सोपं झालं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world